Tue, Apr 23, 2019 20:13होमपेज › Solapur › नो-पार्किंगमधील वाहनाबरोबर छोट्या मुलीलाही घातले क्रेनवर!

नो-पार्किंगमधील वाहनाबरोबर छोट्या मुलीलाही घातले क्रेनवर!

Published On: Jun 27 2018 1:22AM | Last Updated: Jun 26 2018 11:26PMसोलापूर : प्रतिनिधी 

नो-पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी उचलून नेताना शहर वाहतूक शाखेच्या झीरो पोलिस कर्मचार्‍यांनी त्या दुचाकीसोबत पालकासह एका शाळकरी मुलीलादेखील क्रेनवर उचलून नेले. पाठीवर दप्तर घेतलेली ही विद्यार्थिनी शाळेत जात असताना वडिलांच्या चुकीने दुचाकी नो-पार्किंगमध्ये लावली गेली. वडिलांनी विनवणी करूनही दुचाकी न सोडता विद्यार्थिनीसह पालकांना वाहतूक शाखेच्या कार्यालयात नेऊन अडीचशे रुपये दंड वसूल करण्यात आला. हा प्रकार सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शासकीय रुग्णालयानजीक घडला. या कारवाईचे छायाचित्र सोशल मीडियावर 

व्हायरल होताच शहरात एकच संताप उसळला. प्रहार शेतकरी संघटना व जनशक्ती पक्षाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात येऊन संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. अन्यथा, 30 जून रोजी भव्य मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. पोलिस आयुक्तांनीदेखील या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

सविस्तर असे की, अंबादास मेरगू हे आपल्या दुचाकीवरून मुलीला शाळेत सोडण्यासाठी निघाले होते. वाटेत त्यांनी शासकीय रुग्णालयामध्ये असलेल्या लक्ष्मी मंदिरात दर्शन घेण्याचे ठरविले आणि गाडी मंदिराच्या बाजूला लावून ते मुलीसह दर्शनाला गेले. याचवेळीस एम.एच.25 पी 7475 ही वाहतूक शाखेची क्रेन तेथे आली. क्रेनवरील झिरो पोलिस कर्मचार्‍यांनी मेरगू यांच्यासह अनेकांच्या गाड्या उचलल्या. मेरगू यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी वाहतूक शाखेचे पोलिस आणि त्या झिरो कर्मचार्‍यांना ती माझी गाडी आहे. मला माझ्या मुलीला शाळेत सोडायला जायचे आहे. खूप उशीर होऊ लागला आहे. मला माझी गाडी द्या, अशी विनवणी केली. परंतु पोलिस व त्या कर्मचार्‍यांनी मेरगू यांचे कसलेच ऐकले नाही. उलट त्यांना व त्यांच्या गणवेश व पाठीवर दप्तर घेतलेल्या छोट्या मुलीलाही क्रेनवर बसविले आणि वाहतूक कार्यालयात नेऊन त्यांच्याकडून 250 रुपये दंड वसूल केला. 

हा प्रकार रस्त्याने जाणे-येणे करणार्‍या प्रत्येकाने पाहिला व मोबाईलवर त्याचे चित्रिकरण केले. गणवेशातील मुलगी उभी असलेले पाहून पोलिसांच्या या निंदाजनक प्रकाराबाबत संताप व्यक्त केला. अनेकांनी क्रेनवर बसलेली ती मुलगी व तिचे पालक यांचे फोटो सर्वत्र व्हायरल केले. ज्यांनी ज्यांनी फोटो पाहिले त्यांनी संतापच व्यक्त केला. प्रहार संघटनेने संबंधित वाहतूक शाखेचा कर्मचारी व त्या झिरो कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, वाहनधारकांची पिळवणूक करणार्‍या वाहतूक शाखेच्या पोलिसांविरोधात शनिवारी सात रस्ता ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. शहर वाहतूक शाखेमार्फत शहरातील विविध ठिकाणांहून जी वाहने उचलली जातात ती वाहने उचलण्यासाठी क्रेन भाड्याने घेतले असून, त्यावर काम करणारे कर्मचारीसुद्धा दमदाटी आणि उद्धटपणा करून दररोजचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी सर्रास वाहने उचलत आहेत. शहरात पार्किंगची व्यवस्था तोकडी असून, शाळा आणि महाविद्यालयांपासूनसुद्धा विद्यार्थ्यांची वाहने उचलली जात असल्यामुळे सर्वांमध्येच क्रेनची जणू धास्तीच बसली आहे. 

शहर वाहतूक शाखेच्या संवेदनशून्यतेचा तीव्र शब्दांत निषेध करत, प्रहार शेतकरी संघटना व जनशक्ती पक्षाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अन्यथा 30 जून रोजी सात रस्ता ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर सायंकाळी 4 वाजता भव्य मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. सोलापूर शहरात उत्तर व शहर असे दोन वाहतूक शाखा कार्य करतात. शहरभर या दोन्ही शाखेचे वाहतूक पोलिस शहरातील नो-पार्किंगच्या ठिकाणी जी वाहने पार्क केली जातात, ती वाहने क्रेनद्वारे उचलून जेलरोड परिसरात नेऊन ठेवतात. सदरचा मोर्चा हा पोलिस व जनता यांमधील दरी संपवण्यासाठीचा असल्याची माहिती संघटनेचे जमीर शेख यांनी दिली आहे.

माहिती घेऊन कारवाई करू : पोलिस आयुक्त

झालेला प्रकाराची माहिती घेवून संबंधितांवर कारवाई केली जाईल. जो आहे तो दंड भरून त्याच ठिकाणी गाडी सोडून दिली पाहिजे. जागेवर दंड घेतला जात नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर आपण वाहतूक शाखेस तशा सूचना देऊ, असे पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे यांनी सांगितले. तसेच घडल्याप्रकाराची माहिती घेवून कारवाई करू, असेही ते म्हणाले.