होमपेज › Solapur › गोपीनाथरावांना राज्यात काम करायचे होते

गोपीनाथरावांना राज्यात काम करायचे होते

Published On: Dec 13 2017 1:48AM | Last Updated: Dec 12 2017 10:21PM

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी 

स्व. गोपीनाथ मुंढे यांचे व्यक्‍तिमत्त्व प्रसंगावधानी, दिलदार, प्रेमळ आणि उदार असे होते. स्व. गोपीनाथराव मुंढे यांना केंद्रापेक्षा राज्यात काम करण्याची फार इच्छा होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे, हे स्वप्न घेऊन त्यांनी चार दशकाहून अधिक काळ राज्यात कार्य केले, परंतु दुर्दैवाने त्यांचे हे स्वप्न साकार होऊ शकले नाही, अशी भावना भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी व्यक्‍त केली.
पंढरपूर भाजपच्या वतीने स्व. गोपीनाथराव मुंढे यांच्या जयंती निमित्त आयोजित ‘आठवणीतील गोपीनाथराव’ या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पंढरपूर शहर भाजपचे अध्यक्ष संजय वाईकर होते.

केळकर  म्हणाल्या की, ते कधीही कार्यकर्त्यांवर चिडत नसत. गोड बोलून काम कसे करून घ्यायचे, याची हातोटी त्यांच्याकडे होती. गोपीनाथजी महिला कार्यकर्त्यांना योग्य ते मार्गदर्शन करीत असत. ते अत्यंत कुटुंबवत्सल होते. परिचयातील कुटुंबातील मुलांची नावेसुद्धा त्यांना माहीत असत. माझ्या मुलाचा मोठा अपघात झाला तेव्हा त्यांच्या मदतीनेच तत्काळ वैद्यकीय मदत मिळाल्याने त्याचे प्राण वाचले.

त्यांच्याकडे विविध कामांसाठी रोज हजारो माणसे यायची, परंतु ही माणसे कधीही विन्मुख परत आली नाहीत. उपमुख्यमंत्री असतानाही ज्येष्ठ नेत्यांचा मान सन्मान ठेवणे हे ते कधीही विसरत नसत.
केंद्रीय ग्रामविकासमंत्री असताना त्यांना राज्यात काम करायचे होते, त्यासाठी हे मंत्रीपद सोडून ते महाराष्ट्रात येऊन काम करण्याच्या विचारात होते. बीडमध्ये त्यांचा सत्कार आयोजित केला होता. 
यादरम्यान, कार्यकर्त्यांशी दूरध्वनीवरून आपल्या भावना व्यक्‍त केल्या होत्या. त्यावेळी ते म्हणाले की, मला केंद्रापेक्षा राज्यात काम करायला आवडेल. माझा तसा प्रयत्नही चालू आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणे हे माझे स्वप्न आहे, असे ते म्हणाले होते; पण तो दूरध्वनी त्यांचा अखेरचा ठरेल, असे कोणालाही वाटले नव्हते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय वाईकर यांनी केले. सूत्रसंचालन कैलास कारंडे यांनी केले. स्वागत शंतनू दंडवते यांनी केले. 
आभार शकुंतला नडगिरे यांनी मानले. यावेळी नीता केळकर यांचा सुप्रिया वाईकर, शकुंतला नडगिरे, अपर्णा तारके, रेखा कुलकर्णी यांनी सत्कार केला. 

या कार्यक्रमास श्रीरंग केळकर, वि. मा. मिरासदार, शाम तापडिया, जगदीश डांगे, आनंद नगरकर, दत्तासिंह राजपूत, उमेश वाघोलीकर, सुरेंद्र कवठेकर, संदीप कुलकर्णी, आनंद कुलकर्णी, सौदागर मोळक, अनिल शिंदे, कांतीलाल सुपेकर, श्रीराम बडवे, मालती वाईकर, अपर्णा तारके, पूजा बोरामणीकर, हर्षदा नगरकर, त्र्यंबक महाजन-बडवे, प्रसाद आटपाडीकर, आण्णा धोत्रे, संतोष जाधव, श्रीनिवास खाबाणे, नितीन करंडे, डॉ. प्राजक्‍ता बेणारे, बंटी लव्हेकर, ओंकार जोशी, पार्थ बेणारे, राम चौगुले, अश्पाक नदाफ, नगरसेवक अनिल अभंगराव, देवयानी दामोदरे यांच्यासह रखुमाई क्लबच्या सदस्या उपस्थित होत्या.