Sun, May 19, 2019 22:59होमपेज › Solapur › नीरा खोर्‍यातील धरणांतून विसर्ग

नीरा खोर्‍यातील धरणांतून विसर्ग

Published On: Aug 19 2018 1:34AM | Last Updated: Aug 18 2018 9:02PMसोलापूर ः प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर व सांगोला तालुक्यांतील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेल्या नीरा खोर्‍यातील भाटघर, नीरा-देवधर व वीर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे नीरा व भीमा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे 1 जून ते 18 ऑगस्टच्या कालावधीत जिल्ह्यात सरासरी 263.64 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्याच्या काही भागांत दोन दिवसांपासून पावसाची हजेरी कायम होती.

नीरा खोर्‍यातील भाटघर, नीरा-देवधर व वीर ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. तसेच भाटघर व नीरा-देवधर या धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग वीर धरणात येत आहे. या विसर्गामुळे वीर धरणामधून काल सायंकाळी 13 हजार 911 क्युसेक विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आला होता. परंतु, पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे रात्री एक वाजता पुन्हा यात वाढ करण्यात आली. 

नीरा-देवधर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत आहे. धरणात येणार्‍या विसर्गाचा विचार करून वीर धरणामधून नीरा नदी पात्रात सोडण्यात येणार्‍या विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून उपविभागीय अभियंता, वीर धरण यांच्याकडून तहसीलदार खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर, पुरंदर, बारामती व इंदापूर यांना संबंधित कार्यक्षेत्रातील नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती वीर धरण उपविभागाचे उपविभागीय अभियंता अजित जमदाडे यांनी दै. ‘पुढारी’ ला दिली.

यावर्षीच्या हंगामात वीर धरण दुसर्‍यांदा पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. धरणात यावर्षी 22 जुलै रोजी 97.15 टक्के पाणीसाठा झालेला होता. परंतु पावसाने उघडीप घेतलेली होती व वीर धरणामधून नीरा उजवा व डावा कालव्यास खरीप हंगामातील आवर्तन सुरू असल्यामुळे धरणाची पाणीपातळी 97.15 टक्क्यांवरून 84.87 टक्क्यांवर आलेली होती. परंतु मागील चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वीर धरण पुन्हा भरलेले आहे. नीरा खोर्‍यातील धरणे भरलेली असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर व सांगोला तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण व पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर तालुक्यांतील शेतकर्‍यांत आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. दरम्यान, नीरा नदीत विसर्ग सुरू असल्यामुळे भीमा नदीकाठच्या माळशिरस व पंढरपूर तालुक्यांतील शेतकर्‍यांना याचा फायदा होणार आहे. यामुळे  सोलापूर शहराचा पाणीप्रश्‍नही मिटण्याची शक्यता आहे.

धरणांची स्थिती खालीलप्रमाणे

भाटघर धरण : पाणीपातळी 623.28 मीटर., एकूण साठा 672.65 द.ल.घ.मी., उपयुक्त साठा 665.57 द.ल.घ.मी., टक्केवारी 100 टक्के, उपयुक्त साठा 23.50 टीएमसी.

नीरा देवधर : पाणीपातळी 667.10 मीटर., एकूण साठा 337.38 द.ल.घ.मी., उपयुक्त साठा 332.12 द.ल.घ.मी., टक्केवारी  100 टक्के, उपयुक्त साठा 11.73 टीएमसी.

वीर धरण : पाणीपातळी 579.85 मीटर, एकूण साठा 278.49 द.ल.घ.मी., उपयुक्त साठा 266.40 द.ल.घ.मी., टक्केवारी 100 टक्के, उपयुक्त साठा 9.41 टीएमसी.