Sat, Apr 20, 2019 10:33होमपेज › Solapur › नीरा उजवा कालव्याच्या पाण्याची नासाडी

नीरा उजवा कालव्याच्या पाण्याची नासाडी

Published On: Dec 09 2017 1:47AM | Last Updated: Dec 08 2017 8:54PM

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

नीरा उजवा कालव्यातून सोडण्यात आलेल्या आवर्तनाचे पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी केलेले नियोजन फसल्यामुळे रानोमाळ पाणी वाया जात आहे. शेती पिकाऐवजी ओढे नाल्यांना पाणी जास्त सोडून देण्यात आल्याने ऐन उन्हाळी पाळीला पाण्याची टंचाई जाणवणार आहे. त्यामुळे सध्या तालुक्यात सोडण्यात आलेल्या पाण्याचे योग्य नियोजन पाटबंधारे विभागाने करण्याची मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.

पंढरपूर, सांगोला, माळशिरस तालुक्यासाठी निरा उजवा कालवा वरदान ठरला आहे.   चालू वर्षी परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने राज्यातील सर्वच धरणे शंभर टक्के भरली आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील निरा, देवधर, भाटघर आदी धरणेही भरण्यात आल्याने या धरणातील पाणी शेतीसाठी सोडण्यात येत आहे. निरा उजवा कालव्यातून खरीप हंगामासाठी सोडण्यात आलेले आवर्तन पिकांना लाभदायक ठरत असले तरी पाणी मागणी अर्ज कमी प्रमाणात आले आहेत. त्यामुळे मागणी अर्जाचा विचार करून आवश्यक तेवढेच पाणी फाट्याला सोडून उर्वरित पाण्याची बचत करणे आवश्यक आहे. मात्र सध्या तालुक्यात सुरू असलेल्या आवर्तनाचे पाणी पिकांऐवजी ओढे, नाल्यांना सोडून देण्यात आले आहे.

सध्या विहिरी, बोअरवेलला पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे नीरा उजवाचे पाणी घेण्याचा प्रयत्न शेतकरी करताना दिसत नाहीत. ज्या शेतकर्‍यांनी पाण्याची मागणी केली आहे. त्या शेतकर्‍यांच्या पिकांना पाण्याची दुसरी सोय नसल्याने या पाण्याचा वापर करीत आहेत. तर बहुतांश शेतकरी शेततळी भरून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. या आवर्तनात पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याने उन्हाळी आवर्तनासाठी वाढती पाण्याची मागणी पूर्ण करणे अवघड जाणार आहे. याकडे निरा उजवा कालव्याच्या अधिकार्‍यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.