Fri, Jul 19, 2019 19:49होमपेज › Solapur › पवारांच्या भेटीला रूसलेले आले, कुंपणावर बसलेलेही आले

पवारांच्या भेटीला रूसलेले आले, कुंपणावर बसलेलेही आले

Published On: Feb 18 2018 2:04AM | Last Updated: Feb 18 2018 6:30PMपंढरपूर : प्रतिनिधी 

वाडीकुरोली (ता. पंढरपूर)  येथे  खा. शरद पवार आणि सुशिलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यास सोलापूर जिल्ह्यातील सारे नेते आले. यामध्ये पक्षावर रूसलेले आले, पक्ष सोडून जाण्यासाठी कुंपणावर बसलेलेही परत आले. त्यामुळे मग खा. पवार आणि सुशिलकुमार शिंदे यांनीही सगळ्यांना कानपिचक्या देत आम्ही एक आहोत, जिल्हा परिषद, जिल्हा बँकेसह सगळ्या चुका दुरूस्त करण्याचे आदेशच देऊन टाकले. 

वाडी कुरोली (ता.पंढरपूर) येथे सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण सोहळा आणि शेतकरी मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे प्रमुख उपस्थित होते. यावेळी  खा. विजयसिंह मोहिते-पाटील, खा. धनंजय महाडिक, आ. बबनदादा शिंदे,  आ. भारत भालके, आ. हणमंत डोळस, आ. गणपतराव देशमुख, आ. सिद्धाराम म्हेत्रे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. दत्तात्रय सावंत, माजी आ. दिलीप माने, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आ. राजन पाटील, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, माजी आ. दिपक साळूंखे-पाटील, माजी आ. विनायक पाटील, शिवाजी काळूंगे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, राजूबापू पाटील, बळीरामकाका साठे, बाळासाहेब शेळके आदी प्रमुख पदाधिकार्‍यांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील  महत्वाचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील राजकीय परिस्थीती गेल्या काही वर्षात बिघडलेली आहे.

या पार्श्‍वभूमीवर या मेळाव्यास उपस्थित असलेले सर्वच चेहरे पाहून राजकीय स्थित्यंतरे बदलत असल्याचे दिसून येत होते.  यावेळी बोलताना आ.भारत भालके यांनी राजकीय नेत्यांना मागील निवडणूकीतील पक्षांतर्गत दगाबाजीचा मुद्दा उपस्थित केला. तोच धागा पकडून सुशिलकुमार शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ऐक्याची भावना व्यक्त केली. आणि खा. शरद पवारांनी यापुढे जाऊन राष्ट्रवादीमधील दादागीरीवर बोट ठेवत मागील निवडणुकीत जनतेने चुक केली नाही. तर नेत्यांनीच चुका केल्या असे सांगून पुढे ही चुक करायची नाही, असे नेत्यांकडून वदवून घेतले. त्यामुळे यावेळी उपस्थितांमध्ये चांगलीच हास्याची कारंजी उडाली. साखर कारखानदारी, शेतकरी, शेतमालांचे बाजारभाव, वीज बील आणि वीज पुरवठा खंडित करणे, उजनीचे पाणी, राष्ट्रीय महामार्ग या सगळ्या ज्वलंत समस्यांवर यावेळी चर्चा होऊन केंद्र आणि राज्य सरकार या प्रश्‍नी न्याय देऊ शकत नाही तेव्हा हे सरकारच उलथवून टाकण्याची भाषा नेत्यांनी केली. या मेळाव्यामुळे पुढील काळात जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते एक दिलाने काम करतील. जे दुसर्‍या पक्षात गेलेत ते परत येतील, जे कुंपनावर आहेत ते पक्षातच थांबतील आणि राजकीय घडी पुर्ववत बसेल अशी आशा निर्माण झाली आहे. 

इथून पुढे चूक करायची नाय, काय बबनदादा?
तुम्ही लोकांनी पंढरपुरात भारत भालके, माढ्यातून बबनदादांना निवडूण दिले, लोकसभेला विजयदादांना मते दिली. तुम्ही काय चुक केली? तुम्ही लोकांनी तुमचे काम चांगले केले. इथून पुढे चुक करायची नाय, काय बबनदादा ? इथून पुढे नाही करायचं. चला बबनदादांनी सांगीतले नाही करायचं, त्यामुळे मला करमाळ्याची काळजी नाही. मला आजूबाजूची काळजी नाही. बाकीच्या संस्थाही निटनेटक्या करा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बँक सर्व ठिकाणी एकजुटीने करायचे ठरवले तर दिल्लीला मोदी आणि महाराष्ट्रात फडणवीस काही करू शकत नाहीत. ही आपली सामुदायीक शक्ती आहे.