होमपेज › Solapur › राष्ट्रीय महामार्गामुळे शेतकरी संकटात

राष्ट्रीय महामार्गामुळे शेतकरी संकटात

Published On: Feb 04 2018 10:56PM | Last Updated: Feb 04 2018 8:24PMपंढरपूर : प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्ग निर्मितीचे काम सध्या वेगाने सुरू असले तरी या महामार्गामुळे शेकडो हेक्टर सुपीक जमीन उद्ध्वस्त होणार आहे. सुपीक शेतीचे नुकसान टाळता येईल अशा पर्यायाचा विचार न करता सॅटेलाईटवरून रस्त्याचा नकाशा तयार करण्यात आला आहे. यामुळे पंढरपूर तालुक्यात शेतकर्‍यांतून खळबळ उडाली आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन करूनही माळशिरस तालुक्यात नुकसान भरपाई दिलेली नाही. तर उस्मानाबाद जिल्ह्यात अतिशय तुटपूंजी नुकसान भरपाई शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केलेली आहे. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील शेतकरी सावध होऊन या महामार्गास विरोध करण्यासाठी एकवटू लागले आहेत. 

सध्या सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. रत्नागिरी-नागपूर, सातारा-लातूर, मोहोळ-देहू-आळंदी, टेंभुर्णी-विजापूर, सातारा-पंढरपूर या मार्गांची कामे सुरू आहेत. यातील  चौपदरी महामार्गांसाठी भूसंपादन करण्याची गरज पडलेली नाही. मात्र मोहोळ-पंढरपूर-पुणे हा पालखी महामार्ग 6 पदरी असल्यामुळे या मार्गासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. तसेच या मार्गावर पंढरपूर शहराबाहेरून रिंग रोड असून हा संपूर्ण रिंगरोड पंढरपूर शहराच्या परिसरातील लाखो रुपये किंमत असलेल्या तसेच भीमा नदीच्या सुपीक पट्ट्यातूनच आहे. त्यामुळे या रिंगरोडसाठी शेकडो हेक्टर जमीन संपादन करावी लागणार आहे. भूसंपादन करण्यासाठी जाहीर नोटिफीकेशन केले असून हरकती सादर करण्याचे आवाहन करण्यात आले. 

या महामार्गाला पूरक ठरतील अशा पूर्वीच्याच रस्त्याचा विकास करणे सोयीचे ठरले असते. याचा विचार न करता जुने रस्ते तसेच ठेऊन पूर्णपणे नव्याने महामार्गाची बांधणी प्रस्तावित आहे. त्यामुळे रस्त्यासाठी नव्याने भूसंपादन करावे लागणार आहे. बाह्यवळण रस्ता पूर्णपणे सुपीक पट्ट्यातून गेला आहे. 

माळशिरसमध्ये नुकसान भरपाई दिली नाही.
माळशिरस तालुक्यात सातारा-लातूर महामार्गासाठी भूसंपादन करताना कसलीही कायदेशीर प्रक्रिया राबवली गेली नाही. शेतकर्‍यांच्या जमिनी संपादन केल्या त्या मार्गावरील घरे पाडली. द्राक्ष, डाळिंब बागा काढून टाकल्या. हजारो झाडे तोडली परंतु शेतकर्‍यांना नुकसान भरपाई दिली नाही.