Sun, Aug 18, 2019 14:22होमपेज › Solapur › पक्षांतर्गत वादाने पोखरली जिल्हा राष्ट्रवादी

पक्षांतर्गत वादाने पोखरली जिल्हा राष्ट्रवादी

Published On: Aug 21 2018 1:41AM | Last Updated: Aug 20 2018 11:37PMसोलापूर : प्रशांत माने

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून धुमसत असलेली पक्षांतर्गत गटबाजी आणि वाद पाहता आगामी निवडणुकीमध्ये आपले हक्काचे आणि भरवशाचे उमेदवार टिकवण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर असणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून सुरु असलेल्या पक्षांतर्गत गटबाजीचा मोठा फटका आगामीकाळात पक्षाला  बसण्याची शक्यता असून वरिष्ठ नेत्यांचे गटबाजीकडे दुर्लक्ष पक्षालाच अडचणीचे ठरणार आहे.

सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. जिल्ह्यात लोकसभेची एक  आणि पाच ते सहा विधानसभा मतदारसंघांवर राष्ट्रवादीचे कायम वर्चस्व असायचे. ग्रामीण भागात राष्ट्रवादीचा प्रचंड दबदबा असल्यामुळे जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा दूध संघ, नगरपरिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकांत राष्ट्रवादीचा जिल्ह्यात बोलबाला असायचा. राष्ट्रवादीचा इतका मजबूत गड असलेल्या सोलापूर जिल्ह्याची वाताहात झाली तरी दुसर्‍या कोणाकडून नव्हे तर पक्षांतर्गतच्या गटबाजी व वादामुळेच होय.

 राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या गटा-तटावरुन राष्ट्रवादीच्या यशस्वी वाटचालीस ग्रहण लागले ते आजपर्यंत सुटले नसल्याचेच स्पष्ट होते. कारण राष्ट्रवादीच्या ताब्यातील जिल्हा परिषद सध्या भाजप पुरस्कृत आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सध्या प्रशासक आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यातील जिल्हा दूध संघ सध्या भाजप पुरस्कृत आमदारांच्या ताब्यात आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अनेक ठिकाणी दूर फेकली गेल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीमधील पक्षांतर्गत वादाचा लाभ उठविणार नाही तो भाजप कसला. भाजपच्या सहकारमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक नियुक्त करुन नियमबाह्य कर्जप्रकरणाची टांगती तलवार राष्ट्रवादीच्या नेत्यांवर लटकवलेली आहे.  राष्ट्रवादीचे बहुतांश आजी-माजी आमदार जिल्हा बँकेवर संचालक आहेत. 
सहकार मंत्रालयाने जसे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अपहार प्रकरणात गुन्हे दाखल करुन काँग्रेसच्या दिग्गजांना अडचणीत आणले होते तसाच प्रकार भविष्यात जिल्हा बँकेबाबतीत घडल्यास नवल वाटायला नको.एक तर सहकार मंत्रालयाची टांगती तलवार त्यातच भर पक्षांतर्गत गटबाजी आणि वादाची आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अनेक नेते भविष्यात घड्याळ काढून हातात कमळ घेण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. 
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांनी लक्ष घालून पक्षांतर्गत गटबाजी संपुष्टात आणण्यासाठी पुढाकार आताच घेण्याची गरज आहे. नाही तर आगामीकाळात राष्ट्रवादीचे भरवशाचे अनेक पक्षी पिंजरा तोडून पळण्याच्या नादात आहेत.