Wed, Apr 24, 2019 16:29होमपेज › Solapur › कोट्यवधीसाठी अपहरण केलेल्या तरुणाची सुटका

कोट्यवधीसाठी अपहरण केलेल्या तरुणाची सुटका

Published On: Dec 25 2017 1:17AM | Last Updated: Dec 24 2017 10:37PM

बुकमार्क करा

नातेपुते : वार्ताहर 

पोलिस असल्याचा बहाणा करून नातेपुते येथील युवक राजू चंद्रकांत पवार (वय 28) याचे अपहरण करून व बेदम मारहाण करून कोट्यवधी रुपयांच्या इस्टेटीची नोटरी करून घेतल्याच्या गुन्ह्यात दत्ता रावसाहेब मगर याच्यासह साथीदारांना नातेपुते पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

राजू पवार व त्यांच्या कुटुंबाची मालकीची अडीच एकर जमीन पुणे- पंढरपूर रोड लगत हिरा ढाब्यासमोर आहे. या जमिनीची किंमत करोडो रुपये आहे. संबंधित जमीन हडप करण्याच्या हेतूने अंकुश सूर्यवंशी व मल्हारी हुलगे या मुख्य सूत्रधारांनी मगराचे निमगाव येथील पैलवान दत्ता मगर व त्याच्या साथीदारांच्या सहकार्याने राजू पवार यास पोलिस असल्याचे सांगून व वारंट आहे. पोलिस स्टेशनला न्यायचे आहे म्हणून अपहरण केले. त्यास प्रथम निमगांव येथील तालमीत नेऊन बेदम मारहाण करून नंतर दहिवडी येथील अ‍ॅड. सावंत यांच्या पुढे सदर जमीनीची नोटरी करून घेतली. 

दरम्यान, राजू पवार याच्या कुटुंबाने नातेपुते पोलिस स्टेशनला संपर्क साधला असता पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जलद तपास करुन मुख्य सूत्रधाराचा नंबर शोधून त्यास फोन केला असता त्यांनी राजूला कातर खटाव (ता. माण) येथे सोडून दिले. राजूने दिलेल्या जबाबावरून केलेल्या पोलिस तपासात हा गुन्हा अंकुश सुर्यवंशी व मल्हारी हुलगे यांनी दत्ता मगर व त्याच्या साथीदारांच्या मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

 पोलिस अधीक्षक विरेश प्रभू, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, अकलूजचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजकुमार भुजबळ, पोसई ज्ञानदेव देवकाते,  तपास करून दत्ता मगर, योगेश शेटे (दोघे रा. निमगांव), अजमोद्दीन मुलाणी (रा. नातेपुते) या तिघांना अटक केली आहे. मुख्य सूत्रधार अंकुश सुर्यवंशी व मल्हारी हुलगे यांना पकडण्यासाठी दोन पोलिस पथके त्यांच्या पाळतीवर असून लवकरच त्यांना सुद्धा अटक करू असा विश्‍वास सपोनि राजकुमार भुजबळ यांनी व्यक्त केला.