Mon, Jul 15, 2019 23:37होमपेज › Solapur › अपघातात दाम्पत्य ठार

अपघातात दाम्पत्य ठार

Published On: Apr 17 2018 10:33PM | Last Updated: Apr 17 2018 10:17PMनळदुर्ग : प्रतिनिधी

चिवरी (ता. तुळजापूर) येथील महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी मोटारसायकलवरून जाणार्‍या भाविक दाम्पत्यास अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात ते जागीच ठार झाले. ही घटना मंगळवारी  अणदूर-चिवरी रस्त्यावर सकाळी नऊ वाजता घडली. नागेश आप्पाशा आवताडे (वय 27, रा. दोड्याळ, ता. अक्कलकोट) व सोनम नागेश आवताडे (24) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. आवताडे दाम्पत्य दर मंगळवारी चिवरी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येत होते. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास अणदूर-चिवरी मार्गावरून जात असताना चिवरीकडून भरधाव येणार्‍या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. 

त्यामध्ये नागेश आवताडे यांच्या  डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी सोनम गंभीर जखमी झाली. सोनम यांच्यावर अणदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोनम या गर्भवती होत्या.

अणदूर येथे शवविच्छेदन कक्षात सुविधा नसल्याने जळकोट येथे  मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मृत तरुणाचे अक्कलकोट बसस्थानकासमोर मोबाईलचे दुकान होते. त्यामुळे त्यांच्या तरुण मित्रांनी गर्दी केली होती. अपघातानंतर  वाहनासह चालक फरार झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत नागेश यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. हवालदार विजय सुपनूरे हे पुढील तपास करीत आहेत.