होमपेज › Solapur › सोलापूरमध्ये मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्तीचा १६ संस्थांकडून अपहार

सोलापूरमध्ये मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्तीचा १६ संस्थांकडून अपहार

Published On: Dec 14 2017 1:47AM | Last Updated: Dec 14 2017 1:47AM

बुकमार्क करा

नागपूर :

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीच्या रकमेत गैरव्यवहार करणार्‍या 70 संस्थांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्याकडून गैरव्यवहार झालेल्या रकमेची वसुली सुरू आहे. या संस्थांनी 28 कोटी 30 लाख रुपयांचा अपहार केला असल्याचे निदर्शनास आले असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत दिली. यापैकी 16 संस्था एका सोलापूर जिल्ह्यातील आहेत.

 हसन मुश्रीफ, अजित पवार, शशिकांत शिंदे, नरहरी हिरवाळ, आदी आमदारांनी यासंदर्भात प्रश्‍नोत्तरांच्या तासात तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. या प्रश्‍नाला लेखी उत्तर देताना सामाजिक न्याय मंत्र्यांनी म्हटले आहे, की 70 संस्थांनी 28 कोटी 30 लाख रुपयांचा गैरव्यवहार शिष्यवृत्ती प्रकरणात केला असून, त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची शिफारस विशेष चौकशी पथकाने केली आहे. मात्र, न्यायालयांनी स्थगिती आदेश दिल्याने हे गुन्हे दाखल केलेले नाहीत. मात्र, या संस्थांकडून समाजकल्याण खात्याच्या सहायक आयुक्तांकडून वसुलीची कारवाई सुरू झाली आहे, असे बडोले यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे. याशिवाय बीड जिल्ह्यातील 12 आणि पुणे जिल्ह्यातील 8 संस्थांचा या गैरव्यवहार करणार्‍या संस्थांच्या यादीत समावेश आहे. चंद्रकांत दांगट नर्सिंग इन्स्टिट्यूट (वडगाव बुद्रुक), गिरीराज नर्सिंग स्कूल (बारामती), तेहमी ग्रँट नर्सिंग इन्स्टिट्यूट (पुणे), यश स्कूल ऑफ नर्सिंग (इंदापूर), जय इन्स्टिट्यूट (इंदापूर), भालचंद्र स्कूल ऑफ नर्सिंग (पुणे), जाधवर फाउंडेशन स्कूल ऑफ नर्सिंग (वडगाव बुद्रुक) या पुणे जिल्ह्यातील संस्थांनी शासकीय रकमेचा अपहार केला आहे.

शिष्यवृत्तीच्या रकमेत गैरव्यवहार करणार्‍या 70 पैकी 16 संस्था

सोलापूर जिल्ह्यातील आहेत. या संस्थांची नावे अशी : सहारा इन्स्टिट्यूट (अकलूज), धन्वंतरी इन्स्टिट्यूट (अकलूज), शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ नर्सिंग कॉलेज (बार्शी), सिद्धेश्‍वर नर्सिंग इन्स्टिट्यूट (सोलापूर), बिनीत नर्सिंग इन्स्टिट्यूट, सोलापूर, जनकल्याण नर्सिंग इन्स्टिट्यूट (पंढरपूर), धनश्री नर्सिंग इन्स्टिट्यूट (कुर्डूवाडी), धनराजगिरी इन्स्टिट्यूट (सोलापूर), एस. पी इन्स्टिट्यूट (सोलापूर), मार्कंडेय नर्सिंग स्कूल (सोलापूर), कमलाबेन पटेल इन्स्टिट्यूट (कुंभारी), विजयसिंह मोहिते पाटील नर्सिंग कॉलेज (अकलूज), सरदारबी इन्स्टिट्यूट (मोहोळ), राजमाता जिजाऊ नर्सिंग स्कूल (पंढरपूर), भक्ती इन्स्टिट्यूट (पंढरपूर), यशोधरा नर्सिंग इन्स्टिट्यूट (सोलापूर).