Thu, Jul 18, 2019 21:59होमपेज › Solapur › सोलापूरच्या २२ वर्षीय तरुणाकडून शिवचरित्राचे उर्दूत भाषांतर

सोलापूरच्या २२ वर्षीय तरुणाकडून शिवचरित्र उर्दूत

Published On: Jan 29 2018 7:36PM | Last Updated: Jan 29 2018 8:24PMसोलापूर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी  महाराजांचे कर्तृत्‍व व चरित्र जगभर अभ्यासाचा आणि चर्चेचा विषय ठरले आहे. त्यामुळे विविध भाषांमध्ये शिवचरित्राची भाषांतरेही झाली. असेच एक भाषांतर सोलापुरातील २२ वर्षीय मुस्‍लिम तरुणाने केले आहे. विशेष म्‍हणजे वाएज सय्‍यद याने केलेल्या शिवचरित्राच्या उर्दू भाषांतराची पहिली आवृत्ती प्रकाशनापूर्वीच संपली आहे. 

शहराच्या शनिवार पेठ परिसरात राहणार्‍या वाएज सय्यद या तरुणाने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी शिवचरित्रचे उर्दू भाषेत भाषांतर केले आहे. या भाषांतराने उर्दू आणि मराठी भाषेतील इतिहास अभ्यासकांचे लक्ष त्याने आपल्याकडे वेधून घेतले. वाएजचे आजोबा अ‍ॅड. सय्यद शाह गाजीउद्दीन हे उर्दू भाषेतील ख्यातनाम इतिहास संशोधक होते. त्यांनीदेखील उर्दूतून फुले, शाहू, आंबेडकरांवर ग्रंथरचना केली. त्यांच्यानंतर त्यांचा नातू सय्यद शाह वाएज यानेदेखील आजोबांच्या उर्दू पुरोगामी साहित्य चळवळीचा वारसा कायम ठेवला आहे. 

प्रेम हनवते यांनी लिहलेल्या ‘शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक’ या पुस्तकाचे त्याने उर्दूमध्ये भाषांतर केले आहे. यासोबतच त्याचे उर्दूतून इतिहास संशोधन सुरु आहे. गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीचा संस्थापक मुहम्मद कुली कुतुबशाह हा उर्दू भाषेचा निर्माता आहे. त्याने उर्दू भाषेत काव्यरचना केली आहे. त्याच्या काव्यरचनेचे उर्दू लिप्यांतराचे कामदेखील वाएज सय्यद याने हाती घेतले आहे.

प्रकाशनापूर्वी आवृत्ती संपली

वाएजने भाषांतरीत केलेल्या पुस्तकाचे उद्या रंगभवन येथे सायं. ६.३० वा. निरंजन टकले, न्या. बी.जी. कोळसे-पाटील, एस.एम. मुश्रीफ यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. विशेष म्हणजे प्रकाशनापूर्वीच या पुस्तकाची एक आवृत्ती संपली आहे. त्यामुळे प्रकाशनापूर्वीच वाएज सय्यद याला पुस्‍तकाचे पुर्नमुद्रण करावे लागले आहे.