Mon, Jul 15, 2019 23:55होमपेज › Solapur › दुहेरी खून : ७ आरोपींना कोठडी

दुहेरी खून : ७ आरोपींना कोठडी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बार्शी : तालुका प्रतिनिधी

ताडसौंदणे येथील दुहेरी खून प्रकरणातील अकरापैकी सात आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. विकास बोराडे, राहुल बोराडे, गणेश जाधव, श्रीहरी सातपुते, लक्ष्मण सातपुते, प्रवीण चव्हाण व बालाजी सुरवसे  अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत.

कृष्णा मुरलीधर पाटील (वय 45), माणिक कुंडलिक सातपुते (60, दोघेही रा. ताडसौंदणे) अशी खून झालेल्यांची नावे आहेत.  शुक्रवारी सायंकाळी बार्शी-ताडसौंदणे रस्त्यावरून ताडसौंदणे तंटामुक्‍ती  समितीचे अध्यक्ष कृष्णा मुरलीधर पाटील, माणिक कुंडलिक सातपुते, सुदाम शंकर चव्हाण (60) हे तिघे एका दुचाकीवरून जात होते. तर फिर्यादी राहुल तानाजी पाटील हे पाठीमागून येत होते. दरम्यान, गावापासून एक कि.मी.  अंतरावर आरोपींनी पिकअप वाहनाद्वारे दुचाकीला जोराची धडक देऊन खाली पाडले. डोळ्यात चटणीची पूड टाकून तलवार, कोयते, लोखंडी पाईप, लाकडी दांडके याने डोक्यात, पायावर, पाठीत, हातावर सपासप वार केले. हत्यारे तेथेच टाकून आरोपींनी पलायन केले. 

या हल्ल्यात कृष्णा मुरलीधर पाटील व माणिक कुंडलिक सातपुते  हे दोघेही जागीच ठार झाले, तर सुदाम शंकर चव्हाण हा 60 वर्षांचा वृद्ध गंभीर जखमी झाला. याप्रकरणी राहुल तानाजी पाटील यांनी पांगरी पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार एकूण 11 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सुदाम चव्हाण यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास स.पो.नि. धनंजय ढोणे हे करत आहेत.

खुनाची दीड महिन्यातील तिसरी घटना

पांगरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाची मालिकाच सुरू असून दीड महिन्याच्या काळातील खुनाची ही तिसरी घटना आहे. खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने सातजणांना ताब्यात घेतले. उर्वरित चारजणांच्या अटकेसाठी पोलिसांची तपास पथके नेमली आहेत. पूर्ववैमनस्यामधून खुनाची दुहेरी घटना घडल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.