Sat, Jul 20, 2019 08:38होमपेज › Solapur › मनपा कर्मचार्‍यांना आता वसुलीच्या प्रमाणात वेतन

मनपा कर्मचार्‍यांना आता वसुलीच्या प्रमाणात वेतन

Published On: Mar 07 2018 11:19PM | Last Updated: Mar 07 2018 9:26PMसोलापूर प्रतिनिधी 

आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेला सावरण्यासाठी तसेच निर्ढावलेल्या कर्मचार्‍यांना शिस्त लावण्यासाठी महापालिका आयुक्‍त डॉ. अविनाश ढाकणे हे कर्तव्यकठोर झाले आहेत. यापुढे मनपा कर्मचार्‍यांना त्यांच्या वसुलीच्या प्रमाणात वेतन देण्याचा निर्णय आयक्‍तांनी घेतला आहे.

पत्रकारांशी बोलताना आयुक्‍त डॉ. अविनाश ढाकणे यांनी ही माहिती दिली. वसुलीच्या प्रमाणात वेतन देण्याची नवी पद्धत एप्रिलपासून लागू होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शहरातील सेटलमेंट, रामवाडी आदी संवेदनशील भागात मनपाच्या कर वसुलीचे प्रमाण खूप कमी आहे. अशा ठिकाणांबरोबरच मोठी थकबाकी असलेल्या ठिकाणी वसुलीसाठी आपण स्वत: जाणार आहोत, असे आयुक्‍तांनी सांगितले. 

कर वसुली तसेच कर्मचार्‍यांना शिस्त लावण्यासाठी कर्तव्यकठोर होण्याचे संकेत आयुक्‍तांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यानुसार  त्यांनी याबाबत पावले टाकावयास सुरुवात केल्याचे या निर्णयावरून दिसून येते. त्यामुळे संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.