Sun, Feb 17, 2019 17:09होमपेज › Solapur › 'नव्या योजना प्रस्‍तावित करताना लोकसंख्येचा विचार व्हावा'

'नव्या योजना प्रस्‍तावित करताना लोकसंख्येचा विचार व्हावा'

Published On: Jan 16 2018 6:01PM | Last Updated: Jan 16 2018 6:01PM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि राज्य शासनाचा पाणीपुरवठा विभागाने सोलापूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती द्यावी. भविष्यातील वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार नवीन योजना प्रस्तावित करताना करावा, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिले.

सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदार संघातील माढा, करमाळा, पंढरपूर,सांगोला आणि माळशिरस तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांची आढावा बैठक श्री. खोत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस शिरोळचे आमदार उल्हासदादा पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड, मुख्य अभियंता तथा उपसचिव चंद्रकांत गजभिये,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता सु. ना. गरंडे, कार्यकारी अभियंता एम. एस. भालेराव, बी. के. नागणे आदी उपस्थित होते.

या बैठकीत श्री. खोत यांनी माढा मतदार संघातील राष्ट्रीय पेयजल योजना आणि मुख्यमंत्री पेयजल योजनांच्या कामांचा आढावा घेतला. या योजना वेळेत पूर्ण कराव्यात. या योजनेत समाविष्ट नसलेल्या योजनांचा समावेश मागणी आणि व्यवहार्यता पाहून टप्पा- 2 मध्ये करावा. मंजूर योजनांची निविदा प्रक्रियेसह अन्य प्रक्रिया तात्काळ करत मार्चपर्यंत कामे पूर्ण करून निधी खर्च करावा. आमदार उल्हासदादा पाटील यांची मागणी लक्षात घेता कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव (ता. शिरोळ) साठी दरडोई 70 लिटर प्रमाणे योजना तयार करून पुढील कार्यवाहीचे आदेश दिले. हुपरी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये झाल्यामुळे राष्ट्रीय पेयजल योजनेतील योजना नगरपंचायतीने जिल्हा परिषदेकडे वर्ग करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.