होमपेज › Solapur › सोलापूरकरांवर पुन्हा निर्जळीचे संकट!

सोलापूरकरांवर पुन्हा निर्जळीचे संकट!

Published On: Aug 02 2018 2:01AM | Last Updated: Aug 01 2018 11:29PMसोलापूर : प्रतिनिधी 

गेल्या तीन दिवसांपासून शहरामध्ये सर्वत्र गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नव्याने टाकलेली जलवाहिनी स्वच्छ करण्यासाठी आता वॉशआऊट मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एक-दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता उपायुक्त श्रीकांत मायकलवार यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितली.

केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत सोलापुरातील जलवाहिनी दुरुस्तीचे काम 25 जुलै रोजी उजनीतील पाण्याचा उपसा करणारे पंप बंद केले होते. वास्तविक 48 तासांत हे काम करण्याचे टार्गेट होते. मात्र संथगतीने हे काम झाल्याने 72 तासांहून अधिकवेळ दुरुस्तीसाठी लागला. 

मात्र अवघा एक दिवस जास्त घेतल्यानंतरही नवी जोडलेली जलवाहिनी पूर्ण स्वच्छ केली नाही. त्यामुळे त्यांच्या इतक्या संथगतीने काम झाल्यानंतरही नव्याने जोडलेली जलवाहिनी स्वच्छ केली नसल्याने दीड वर्षे रस्त्याच्या कडेला पडून असलेली जलवाहिनी पुरेशी स्वच्छ न करता तशीच जोडली गेली. शिवाय जोडल्यानंतरही पुरेसा वॉशआऊट न झाल्याने पाकणीतील जलशुध्दीकरण केंद्रातून शुध्द होऊन आलेली पाणी नव्या जलवाहिनीत आल्यावर पुन्हा दूषित झाले व तसेच ते थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोचले.  

जलवाहिनी दुरुस्तीसाठी पाच दिवस पाणी न आलेल्या नागरिकांच्या घरी सहाव्या दिवशी पाणी आले ते अगदी पिवळसर आणि मैलामिश्रीत त्यामुळे पाणी येऊनही नागरिकांना ते  साठवता व वापरताही आले नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्याने जोडलेली जलवाहिनी स्वच्छ करण्यासाठी वॉशआऊट मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी जलवाहिनीच्या टेल एंडमधून दूषित पाणी उच्चदाबाने बाहेर काढण्यात येणार आहे. या सार्‍या प्रक्रियेमुळे आणखी दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता असेल, अशी माहिती उपायुक्त मायकलवार यांनी दिली.