Wed, Jul 17, 2019 20:46होमपेज › Solapur › महापालिकेत ‘गढूळ पाणी’ पेटले!

महापालिकेत ‘गढूळ पाणी’ पेटले!

Published On: Aug 01 2018 1:36AM | Last Updated: Jul 31 2018 11:31PMसोलापूर : प्रतिनिधी

ऐन पावसाळ्यात विस्कळीत आणि गढूळ पाणीपुरवठ्यावरून सत्ताधारी भाजपसह सर्वच विरोधी पक्षांचे गटनेते व नगरसेवकांनी मंगळवारच्या पालिका सर्वसाधारण सभेत गोंधळ घातला. आयुक्तांसह सर्वच अधिकार्‍यांना धारेवर धरत दोषी असणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी केली. तर दोषी अधिकार्‍यांना पाठीशी घालणे व सभेत नवीनच पायंडा पाडण्यावरून महापौर शोभा बनशेट्टी व शिवसेनेचे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव यांनी बाटलीतून आणलेले गढूळ पाणी सभागृहातच पिण्याचा प्रयत्न बसपचे नगरसेवक गणेश पुजारी यांनी केल्याने खळबळ उडाली.

16 जुलै रोजीची तहकूब सर्वसाधारण सभा मंगळवार, 31 जुलै रोजी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी डायसवर उपमहापौर शशिकला बत्तुल, पालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, नगरसचिव प्रवीण दंतकाळे उपस्थित होते. सभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी महापौर सभागृहात येण्या अगोदर काँग्रेस, बसपा, शिवसेना, एमआयएमच्या नगरसेवकांनी गढूळ पाणी आणि विस्कळीत पाणीपुरवठ्यावरुन सभागृहात हंगामा केला. सभेच्या विषय पत्रिकेवरील कामकाज सुरु होण्यापूर्वी महापौरांनी गढूळ पाणीपुरवठ्यावर चर्चेस परवानगी दिली.

काँग्रेस गटनेता चेतन नरोटे, विरोधी पक्षनेता महेश कोठे, सभागृहनेता संजय कोळी, बसपाचे गटनेता आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादीचे गटनेता किसन जाधव, एमआयएमचे गटनेता तौफिक शेख, अ‍ॅड. यु. एन. बेरिया, गणेश वानकर, देवेंद्र कोठे, विनायक विटकर, अनुराधा काटकर, स्वाती बमगोंडा, गणेश पुजारी, बडूरवाले, रियाज खरादी यांनी गढूळ व विस्कळीत पाणीपुरवठ्यावरुन अधिकार्‍यांना धारेवर धरले. महापालिका प्रशासन 12 लाख लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप करण्यात आला.

राष्ट्रवादीचे किसन जाधव यांनी गढूळ पाणी बाटलीत आणले आणि अधिकार्‍यांना प्रश्‍न केला की, तुम्ही सांगता हे पाणी पिण्यायोग्य आहे, तर मग सभागृहात सर्वांसमोर हे पाणी प्यावे. अधिकारी पाणी पित नसल्याचे पाहून बसपाचे नगरसेवक पुजारी यांनी सभागृहातच हे बाटलीतील गढूळ पाणी पिण्याचा प्रयत्न केल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली. काही नगरसेवकांनी मध्यस्थी करीत पुजारी यांच्या हातातून बाटली काढून घेतली.

सभागृहात महापौरांनी दिलेला आदेश अधिकारी पाळत नसल्याचे गणेश वानकर यांनी सहपुरावा निदर्शनास आणले. यावर महापौरांनी वानकर यांना पाण्यावरच बोला, असे सांगत रोखले. तेव्हा चिडलेल्या देवेंद्र कोठे आणि गुरुशांत धुत्तरगावकर यांनी महापौरांना सुनावले की महिला असूनही तुम्हाला पाण्याचे गांभीर्य नाही. प्रशासनावर तुमचा अंकुश नाही. महापौर तुम्ही नगरसेवकांवरच दंडेलशाही दाखवता आणि अधिकार्‍यांना पाठिशी घालता. सभागृहात नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्‍नांना अधिकार्‍यांना उत्तर देण्यास सांगा, चुकीचा पायंडा पाडू नका, असे धुत्तरगावकर यांनी म्हणताच महापौर बनशेट्टी म्हणाल्या की, तुम्ही मला शिकवू नका. त्यावर धुत्तरगावकर म्हणाले, लोकांच्या समस्या मांडतोय, तुम्ही सांगा आत्ता राजीनामा देतो. यावेळी चेतन नरोटे यांनी हस्तक्षेप करीत वाद थांबवला.

उजनी जलवाहिनीवर शटडाऊनसारखा महत्त्वाचा विषय असताना आयुक्तांनी पीएचई गंगाधर दुलंगे यांना रजा दिलीच कशी, असा सवाल आनंद चंदनशिवे यांनी उपस्थित केला. सभागृहनेता कोळी म्हणाले, शटडाऊनचे काम सुरु असतानाही पालिकेचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता. काम घेतलेला आयएचबी कंपनीचा एकही व्यक्ती उपस्थित नव्हता. दोषी अधिकार्‍यांना पाठिशी घालू नका. नगरसेवकांच्या सर्व प्रश्‍नांवर उत्तर देण्याचे आदेश महापौर बनशेट्टी यांनी आयुक्त डॉ. ढाकणे यांना दिल्यानंतर त्यांनी उत्तर दिले.