Sat, Mar 23, 2019 18:55होमपेज › Solapur › मोहोळमध्ये दुचाकीला ट्रकची धडक, तरुण गंभीर जखमी

मोहोळमध्ये दुचाकीला ट्रकची धडक, तरुण गंभीर जखमी

Published On: Jul 20 2018 8:27PM | Last Updated: Jul 20 2018 8:27PMमोहोळ : वार्ताहर

चुकीच्या बाजूने आलेल्या एका ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. रवींद्र श्रीरंग शिंगाडे (वय ३२ वर्षे रा. हिवरे ता.मोहोळ) असे जखमीचे नाव आहे. हा अपघात शुक्रवारी २० जुलै रोजी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला. यावेळी आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांनी जखमीला स्वतःच्या शासकीय गाडीतून उपचारासाठी दाखल करुन खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडवले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिवरे ता. मोहोळ येथील रवींद्र श्रीरंग शिंगाडे हे २० जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजता सोलापूर-पुणे महामार्गावरुन दुचाकीने जात होते. त्यावेळी राँग साईडने आलेल्या एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यामुळे भीषण अपघात होऊन रविंद्र शिंगाडे हे गंभीर जखमी झाले. यावेळी महामार्गावरुन जाणारे आरटीओ प्रशासनातील मोटार वाहन निरीक्षक अनिल शिंदे, स.मो.वाहन निरीक्षक उदयसिंह साळुंखे, स.मो.वाहन निरीक्षक संतोष डुकरे, आणि वाहन चालक विशाल डोंबाळे यांनी प्रसंगावधान दाखवून तात्काळ जखमीला आपल्या शासकीय वाहनातून उपचारासाठी मोहोळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.  यावेळी त्यांची गाडी अक्षरशः रक्ताने माखली होती. मोहोळ ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी रवींद्र शिंगाडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना शासकीय रुग्णवाहिकेतून सोलापूरच्या सिव्हील हॉस्पिटल येथे पाठवून दिले.

खाकी वर्दीतला अधिकारी अथवा कर्मचारी दिसले की, सामान्य नागरिक त्यांच्याकडे भीतीने आणि नकारात्मक दृष्टीने पाहतात. मात्र आरटीओने आपल्या शासकीय वाहनातून रविंद्र शिंगाडे यांना उपचारासाठी दाखल करुन त्याला वाचविण्यासाठी केलेल्या धडपडी वरुन खाकी वर्दीतल्या अधिकाऱ्याला देखील एक संवेदनशील मन असते हे सर्वांनाच जाणवले.