होमपेज › Solapur › कीर्तनातून झाला स्वच्छतेचा जागर

कीर्तनातून झाला स्वच्छतेचा जागर

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 9:02PMपंढरपूर : अरूण बाबर   

ऐशी चंद्रभागा, ऐसे भीमातीर  
ऐसा विटेवर देव कोठे ! 

अशी चंद्रभागा, असे भीमातीर आणि असा कर कटेवर ठेवून युगे अठ्ठावीस विटेवर उभा असलेला सावळा विठ्ठल फक्त पंढरीनगरीतच आहे. मैलो न मैल चालत आलेल्या संतांची वारी विठ्ठला दारी पोहोचली असून आषाढी एकादशी सोहळ्यासाठी लाखो भाविक चंद्रभागातीरी दाखल झाली होते. 

आषाढी एकादशीचे औचित्य साधत पहाटे 2 वाजल्यापासून वैष्णवांनी चंद्रभागा स्नानासाठी गर्दी केली. लाखोच्या संख्येने आलेल्या वैष्णवांनी पंढरीनगरीत तसेच वाळवंटात रात्री उशिरापर्यंत हरीसंकीर्तनामध्ये तल्लीन झालेले दिसून येत होते. लांबच लांब पसरलेली दर्शनरांग त्यासाठी लागणारा वेळ अशा अनेक प्रश्‍नांवर मात करत वैष्णवांनी आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनाला गाठ घातली. काकड्याचे भजन, हरीपाठ, दुपारी प्रदक्षिणा, सायंकाळी किर्तन असा दिनक्रम होता. रोजच्या धकाधकीच्या संसारातून शीणलेल्या भाविकांचा विठूरायाच्या दर्शनाने हरिनामाच्या गजराने आनंद शीगेला पोहचला होता. भक्तीसागरात दिंड्या आणि फडावरील वारक-यांनी एकमुखाने ज्ञानोबा-तुकाराम हरिनामाचा गजर केला आणि अवघी पंढरीनगरी दुमदुमली.भजन, नाम-संकीर्तन दरम्यान आपल्या किर्तनातुन त्यांनी स्वच्छतेचा जागर केला.

शासनाला, स्थानिक प्रशासनाला दोष न देता वारीत स्वच्छता ठेवण्यात भाविकांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे भाविकांनी जर स्वच्छतेचा आग्रह धरला तर या पंढरीचे रूपच पालटेल घरच्या स्वच्छतेला जसे महत्त्व देता तसे पंढरीला महत्त्व द्यावे. स्वच्छ परिसर ठेवणे हा ही एक धर्माचा भाग आहे हे आपल्या किर्तनातुन आवर्जून सांगत होते. दिवसभर विविध मठ, धर्मशाळा आणि मंदिरातून तसेच वाळवंट आणि नदी पलीकडे असलेल्या भक्तीसागरातुन विठ्ठल नामाचा गजर आणि हरिनाम संकीर्तन चालू होते. चंद्रभागेचे स्नान, नगर प्रदक्षिणा, विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन बहुसंख्य भाविक परतले.