Wed, Nov 21, 2018 13:37होमपेज › Solapur › महिन्याच्या बाळाला रुळावर फेकले, आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे बाळ वाचवले

महिन्याच्या बाळाला रुळावर फेकले, आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे बाळ वाचवले

Published On: Sep 06 2018 8:16PM | Last Updated: Sep 06 2018 8:16PMसोलापूर : प्रतिनिधी 

‘देव तारी त्याला कोणा मारी’ म्हणतात त्याची प्रचिती नुकतीच आली. सोलापूर मध्य रेल्वे विभागाच्या दौंड रेल्वेस्थानकापासून अवघ्या अर्धा किलोमीटवर एका निर्दयी माता-पित्यांनी आपल्या एक महिन्याच्या गोंडस मुलाला गुरुवारी मध्यरात्री रुळावर फेकून दिले होते. परंतु  एका पोलिसाने त्या बाळाला वाचवले. 

गुरुवारी पहाटे 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास आरपीएफचे जवान विनीत कुमार कुर्डुवाडी ते दौंड या मार्गावर ड्यूटी करत होते. दौंड रेल्वेस्थानकाजवळ अंधारातून बाळ रडण्याचा आवाज येऊ लागला. ज्या दिशेने आवाज येत होता त्या दिशेला जाऊन हॅलोजनच्या उजेडात आवाज शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना प्लास्टिकच्या पिशवीतून बाळाच्या रडण्याचा आवाज येत असल्याचे निदर्शनास आले. निर्दयी माता-पित्यांनी त्या बाळाला एका कापडामध्ये गुंडाळून प्लास्टिक पिशवीत ठेवून 270/14 कि.मी.च्या रेल्वे खांबाजवळ फेकून दिले होते. 

आरपीएफ जवान विनीत कुमार यांनी ताबडतोब त्या बाळाला कुशीत घेतले. काही मिनिटांतच बाळाने रडणे बंद केले आणि त्या बाळाला लक्षात आले की आपल्याला वाचवायला कोणीतरी आले. या भावनेने ते बाळदेखील विनीत कुमार यांच्या कुशीत शांत झोपले. परंतु त्या आरपीएफ जवानाने वेळेचा थोडाही विचार न करता दौंड येथील एका सरकारी रुग्णालयात उपचारासाठी त्या बाळास पाठाविले. तेथील डॉक्टरांनी त्याची तपासणी करुन बाळ सुखरुप असल्याची खात्री केली.

आरपीएफ जवानांनी त्या गोंडस बाळाची कस्टडी गुरुवारी सकाळी लोहमार्ग पोलिसांच्या हवाली केली. लोहमार्ग पोलिसांनी पुढील उपचार करण्यासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात त्या बाळास दाखल केले तसेच दिवसभर कोर्टाचे कामकाज पूर्ण केले. कोर्टाच्या आदेशानुसार त्या बाळास सुखरुपजागी ठेवले जाणार असल्याची माहिती दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार ए.के. मोतेवार यांनी दिली.

पोलिसांच्या सतर्कतेने बाळाची तब्येत सुखरुप

आरपीएफ जवान व लोहमार्ग पोलिसांनी अगोदर बाळावर उपचार करण्यासाठी धावपळ केली. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करु, अशी भूमिका घेतल्याने बाळाची तब्येत सुखरुप असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एक महिन्याचे बाळ असे रुळावर कोणी फेकून दिले याचा कसून तपासदेखील केला जात आहे.