मोहोळ ः प्रतिनिधी
मागीलवर्षी भीमा-लोकशक्ती परिवाराने मोक्याच्या 3 जि.प. जागा पटकावल्या. जि.प.चे महत्त्वाचे सभापती आणि स्थायी समितीचे सदस्यपदही खेचून घेतले. अनेक वर्षांनंतर जि.प. आणि पं.स.ची एकहाती सत्ता मिळल्यानंतर काही महिन्यांपासून भीमा-लोकशक्ती परिवाराचे पक्षश्रेष्ठी खा. धनंजय महाडिक व ज्येष्ठ नेते मनोहरभाऊ डोंगरे हे दोन्ही नेते आपापल्या कारखानदारीत व्यस्त आहेत. त्यामुळे मोहोळ पंचायत समितीच्या कारभाराकडे त्यांची म्हणावी तशी विकासात्मक नजर नसल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
साहजिकच याचा मोठा फटका निवडणुकीत जीवाचे रान करुन प्रचार करणार्या निष्ठावंतांसह समर्थकांच्या उत्साहाला बसत आहे. त्यामुळे कोल्हापूरचे खा. महाडिक लोकसभेच्या राजकारणात व्यस्त, तर राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहरभाऊ डोंगरे हे लोकशक्ती साखर कारखान्याच्या कामात व्यस्त, तर सत्ता असूनही कार्यकर्ते समन्वयाअभावी त्रस्त आहेत.
तालुक्याच्या राजकारणात भाजप-शिवसेनेची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली ती भीमा-लोकशक्ती परिवाराच्या राजकीय एंट्रीमुळेच. कारण सध्या तालुक्यात सत्ताधारी म्हणून भीमा-लोकशक्ती परिवार जबाबदारी पार पाडत आहे, तर एकेकाळी सत्ताधारी असणार्या राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसावे लागले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्याच असणार्या या दोन गटांतच काय व्हायचे ते राजकारण होताना दिसत आहे. एकेकाळी विरोधकांचा तोरा मिरवणार्या भाजप-शिवसेनेला मात्र सत्ताधारी व विरोधकांचा कलगीतुरा उघड्या डोळ्यांनी पाहावा लागत आहे. अनेक वर्षांनंतर सत्ता आल्यामुळे विकास होईल, पंचायत समिती प्रशासनाला शिस्त लागेल, अशी भाबडी आशा भीमा-लोकशक्ती परिवाराच्या कार्यकर्त्यांना व समर्थकांना होती, मात्र ती फोल ठरली आहे.