होमपेज › Solapur › चोरीचे सोने विकत घेणार्‍या सराफाला अटक  

चोरीचे सोने विकत घेणार्‍या सराफाला अटक  

Published On: Aug 10 2018 5:33PM | Last Updated: Aug 10 2018 5:33PMमोहोळ वार्ताहर : प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यात रेल्वेमध्ये प्रवाशांना लुटणाऱ्या चोरट्यांकडून मोहोळ येथील एका सराफाने चोरीचा मुद्देमाल विकत घेतला. या प्रकरणी पुणे रेल्वे पोलिसांनी मोहोळ शहरातील एका सराफाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अमोल अनिल पंडीत (रा.मोहोळ) असे सदर सराफाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे जिल्ह्यात रेल्वे मध्ये प्रवाशांना लुटण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यापैकी एका गुन्ह्यात रेल्वे पोलिसांनी निशीकांत पवार (रा. वाघाचीवाडी ता. करमाळा यास पकडून गजाआड केले आहे. मात्र त्याने चोरी केलेले लाखो रुपये किंमतीचे सोने लालचंद्र व्यंकट शिंदे (रा.पोखरापूर ता. मोहोळ) यांच्या मदतीने अमोल अनिल पंडीत या सराफाला विक्री केले असल्याचे पोलिस तपासात समोर आले. त्यानुसार शुक्रवारी १० ऑगस्ट रोजी पुणे रेल्वे पोलिसांनी लालचंद्र शिंदे यास अटक केली. त्यानंतर मोहोळ शहरातील सोने व चांदीचे प्रतिष्ठीत व्यवसायीक अमोल अनिल पंडीत या सराफाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यात आणखी तीन ठिकाणी झालेल्या चोरीतील मुद्देमाल देखील पंडीत यांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे रेल्वेमध्ये होणाऱ्या लुटीच्या प्रकरणात मोहोळ कनेक्शन पुन्हा एकदा समोर आले आहे. यापुर्वी देखील मोहोळ शहरातील काही सराफांना तेलंगणा, पुणे, हैदराबाद रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेवून कारवाई केलेली आहे. या प्रकरणात लालचंद्र शिंदे सह अमोल पंडीत यांना पुणे रेल्वेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एम.एन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिस हेड.कॉ. दुधाने, पोलिस नाईक कदम यांनी ताब्यात घेतले आहे. दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास रेल्वे पोलिस पथक आरोपींसह पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहे. या घटनेमुळे मोहोळ शहरासह जिल्ह्याच्या सराफ व्यवसायीकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.