Sun, Jul 21, 2019 00:00होमपेज › Solapur › मोहोळ हल्ल्यातील दरोडेखोर गजाआड

मोहोळ हल्ल्यातील दरोडेखोर गजाआड

Published On: Feb 28 2018 1:11AM | Last Updated: Feb 27 2018 9:51PMसोलापूर : प्रतिनिधी

मोहोळ येथे पोलिसांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करणार्‍या आणि एका नागरिकाचा खून करणार्‍या अट्टल दरोडेखोरास पोलिसांनी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे सापळा लावून  अटक केली. या दरोडेखोराविरुद्ध  जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत  8 गंभीर  स्वरूपाचे  गुन्हे दाखल आहेत.

बाप्पा ऊर्फ छग्या ऊर्फ छगन गंगाराम शिंदे (वय 38, रा. जामगाव, ता. मोहोळ) असे दरोडेखोराचे नाव आहे. छग्या शिंदे याच्यावर  सोलापूर तालुका, अक्‍कलकोट उत्तर, अक्‍कलकोट दक्षिण, मंद्रुप, मोहोळ, मंगळवेढा, कामती या पोलिस ठाण्यांत खून करून दरोडा, जबरी चोरी, दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. शिंदे हा क्रूर आणि अट्टल  गुन्हेगार  आहे. 

मंगळवेढा तालुक्यातील सोड्डी येथील दुहेरी खून व दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी वैजिनाथ रामा भोसले, छग्या गंगाराम शिंदे आणि सागर हे तिघे मोहोळ येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी 13 फेब्रुवारी रोजी मोहोळ येथे सापळा लावला होता. त्यावेळी रात्री साडेसातच्या सुमारास वरील तीनही आरोपी हे दुचाकीवरून आल्यानंतर मोहोळच्या शिवाजी चौकात पोलिसांनी  गाडी आडवी लावून वैजिनाथ भोसले यास ताब्यात घेतले. तर छग्या शिंदे व सागर हे दोघे पोलिस कर्मचारी बोंबीलवार व सचिन मागाडे यांच्यावर चाकूने वार करून पळून गेले होते.पोलिसांच्या मदतीला आलेल्या अबू कुरेशी या नागरिकावर चाकूने वार करुन त्याचा खून केला होता. 

ही घटना घडल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी मोहोळला भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पळून गेलेल्या दरोडेखोरांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांची पथके दरोडेखोरांच्या मागावर होती. पळून गेलेला दरोडेखोर छग्या शिंदे हा करम शिवार, गंगाखेड (जि. परभणी) येथे असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी सोमवारी नियोजन करून करम शिवारात उसाच्या फडात लपून बसलेल्या छग्या शिंदे यास शिताफीने पकडले. यावेळी पोलिसांनी छग्या शिंदे यास कसलीही प्रतिकार करण्याची संधी दिलीच नाही. 

छग्या शिंदे त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर मोहोळ येथे पोलिसांवर हल्ला करून पळून जाताना त्यानेच कुरेशी नावाच्या नागरिकावर वार करुन  त्याचा खून केल्याचे कबूल केले. अशी माहिती पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांनी दिली. या अट्टल गुन्हेगाराला पकडणार्‍या पोलिस पथकाला भरघोस बक्षीस देणार असल्याचेही प्रभू यांनी सांगितले. 

ही कारवाई अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांच्या नेतत्त्वाखाली उपनिरीक्षक हेमंत भंगाळे, रियाज शेख, हवालदार नारायण गोलेकर, विजयकुमार भरले, गोरक्षनाथ मांगुर्डे, रवी माने, अरुण केंद्रे, सागर शिंदे, सचिन गायकवाड, मंद्रुप पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक बाळू चमके, राहुल   सुरवसे, आनंद  दिघे  यांनी केली.
मोहोळमधून पळाला अन् गंगाखेडला अडकला

छग्या शिंदे हा मोहोळमधून पोलिसांवर हल्ला करून नागरिकाचा खून करून पळून गेला. त्यानंतर गेल्या 14 दिवसांपासून स्थानिक गुन्हे  शाखेचे पोलिस त्याच्या मागावरच होते. छग्या हा मोहोळमधून पळून गेल्यानंतर उस्मानाबादमध्ये असताना पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. उस्मानाबादमध्ये पोलिसांनी छग्याचा 6 कि.मी.पर्यंत पाठलाग केला; परंतु तो पोलिसांना चकवा देऊन सटकला होता. त्यामुळे पोलिसांनी छग्याचा पाठलाग आणखी तीव्र करून गंगाखेडमधील करम शिवारात त्याला पकडले.