Sun, Apr 21, 2019 03:50होमपेज › Solapur › मोहोळ : भीमा कारखान्याच्या निवृत्‍त कर्मचार्‍याचे उपोषण 

मोहोळ : भीमा कारखान्याच्या निवृत्‍त कर्मचार्‍याचे उपोषण 

Published On: Aug 01 2018 4:10PM | Last Updated: Aug 01 2018 4:10PMमोहोळ : प्रतिनिधी 

टाकळी सिकंदर तालुका मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना अद्याप निवृत्ती वेतन मिळाले नाही. त्यामुळे सोमवार पासून कर्मचाऱ्यांनी मोहोळ तहसील कार्यालया समोर कारखाना प्रशासनाच्या निषेधार्थ बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यामुळे कारखानदारी क्षेत्रांत मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सन २०१५ ते  डिसेंबर २०१७  अखेर कारखान्याचे ११८ कर्मचारी निवृत्त झाले आहेत. त्यांचे निवृत्ती वेतन मिळावे या मागणीसाठी वेळोवेळी साखर आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी सोलापूर, कामगार आयुक्त सोलापूर व कार्यकारी संचालक भिमा सहकारी साखर कारखाना यांचेकडे वेळोवेळी  निवेदने, चर्चा, आंदोलने, मोर्चे काढण्यात आले. तरीही देयक न मिळाल्याने दि २६ मार्च २०१८ रोजी तहसील कार्यालय मोहोळ येथे आमरण उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी तहसीलदार यांनी दिलेले पत्रानुसार १५ एप्रिल २०१८ पर्यत ५० टक्के व उर्वरीत रक्कम जुन २०१८ पर्यत जमा करण्याचे ठरले होते. मात्र एकुण रक्कमे पैकी ४५ टक्के रक्कमच त्यांना देण्यात आली. जुलै महिना संपला तरी उर्वरीत रक्कम कारखान्याच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना दिली गेली नाही. भीमा कारखाना प्रशासन हे वेळ मारुन नेत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे अस्त्र उपसले असून, सोमवार पासून मोहोळ तहसीलदार कार्यालयाच्या समोर बेमुदत आमरण  उपोषणास बसले आहेत.       
निवृत्त कामगारांच्या मागणीस निवृत्त कर्मचारी (१९९५ ) समन्वय समिती सह अन्य सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपला पाठींबा जाहीर केला आहे. या कामगारांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस उलटला असताना सुद्धा भीमा कारखाना प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कर्मचारी चांगलेच चिडले असून कारखान्याने एक रक्‍कमी वेतन दिल्या शिवाय उपोषण मागे न घेण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात कामगारांचे आंदोलन रौद्र रुप धारण करण्याची शक्यता आहे.  

निवृत्त वेतनावरच कामगारांच्या मुलामुलींची लग्नकार्य, आरोग्य, शिक्षण अवलंबून असते. मात्र हक्काची रक्कम मिळत नसल्याने या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची उपासमार होत असून त्यांचे संसार उघड्यावर आले आहे. त्यामुळे किमान आता तरी कारखाना नेतृत्वाने कर्मचाऱ्यांना हक्काचे पैसे देऊन पुण्य पदरात पाडून द्यावे. अशी भावनिक साद या निवृत्त कर्मचाऱ्यांनी दिली आहे. या उपोषणात दिलावर मणेरी, शिवाजी कोंडकर, शिवाजी शिंदे, अशोक गोंडाळ, गणपत माळी, विष्णू जाधव, राजाभाऊ गायकवाड, नवनाथ भिंगारे, एकनाथ शिंदे, जांबुवंत रोटे, नारायण माळी, शिवाजी म्हामाणे, दगडू भोसले, गोरख भोसले, प्रकाश तनपुरे, सत्यवान खरात, हणमंत डोंगरे, पंढरी भोसले, विजय पाटील, नागनाथ भोसले, पांडुरंग पडसाळकर, शिवाजी टेकाळे, अंगद बचुटे, दत्तात्रय गाढवे, मनोहर पवार, विलास चव्हाण, कुंडलिक भंडारे आदींसह निवृत्त कामगार सहभागी झाले आहेत.

दरम्यान भीमाचे विद्यमान संचालक तथा जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख यांनी बुधवारी आंदोलन स्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्काचे पैसे न मिळाल्यास सोमवार पासून भीमाच्या गेटसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा कारखान्याचे चेअरमन खा. महाडिक यांना देवून घरचा आहेर दिला आहे.