Wed, Apr 24, 2019 21:49होमपेज › Solapur › मोहोळसाठी ग्रामसडक योजनेतून साडेनऊ कोटींचा निधी

मोहोळसाठी ग्रामसडक योजनेतून साडेनऊ कोटींचा निधी

Published On: Feb 06 2018 10:57PM | Last Updated: Feb 06 2018 10:52PMमोहोळ : प्रतिनिधी

मोहोळ विधानसभा मतदारसंघातील बहुतांश गावातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. त्यामुळे मोहोळ मतदारसंघातील मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील रस्त्यांसाठी आमदार रमेश कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भरीव निधीची मागणी लेखी पत्राद्वारे केली होती. त्यानुसार दोन रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तब्बल 9 कोटी पंचवीस लाख 45 हजार रुपयांचा विकास निधी मंजूर झाला आहे. दुसर्‍या टप्प्यात घोडेश्‍वर ते अरबळी रस्त्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर होणार असल्याची माहिती आ. कदम यांचे स्वीय सहाय्यक सतीश भोसले यांनी दिली.

मोहोळ विधानसभा मतदारसंघातील रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी मिळावा यासाठी आ. रमेश कदम यांनी जेलमध्ये असूनही सतत पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. मोहोळ तालुक्यातील अनगर ते थोरात वस्ती या अकरा किमी रस्त्यासाठी पाच कोटी 99 लाख 96 हजार रुपयांचा निधी, तर देखभाल दुरुस्तीसाठी 38 लाख बारा हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील सरकोली ते फुलेनगर या चार किमी रस्त्यासाठी दोन कोटी 55 लाख 77 हजार रुपये आणि याच रस्त्यासाठी पुढील पाच वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीसाठी 17 लाख 37 हजार रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे, असेही यावेळी सतीश भोसले यांनी सांगितले आहे. 

घोडेश्‍वर ते अरबळी या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून चार कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित असून याबाबतच्या मंजुरीचा आदेश लवकरच प्राप्त होणार आहे. याशिवाय उत्तर सोलापूर तालुक्यातील व मोहोळ शहरातील रस्त्यांसाठी भरीव निधीची तरतूद होण्यासाठी आ. रमेश कदम यांचा जेलमध्ये असूनही पाठपुरावा सुरु आहे. त्यामुळे मतदारसंघातील मतदारबांधवांतून त्यांचा विकास कामांच्या भूमिकेबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे आपल्या निधीतून पूर्ण करुन आ. रमेश कदम यांनी जिल्ह्यातील सर्व आमदारांपेक्षा सर्वाधिक विकास निधी खर्च केला आहे. मोहोळ तहसील आवारात पंधरा लाख रुपयांचे पेव्हींग ब्लॉकचे काम पूर्ण झाले आहे. शिवाय शहरातील अंतर्गत सुरक्षिततेसाठी क्लोज सर्कीट कॅमेर्‍यांसाठी वीस लाख रुपयांचा निधी त्यांच्या फंडातून मंजूर झाला असून काही दिवसातच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. यावरुन त्यांनी मोहोळ शहराच्या विकासावर भर देण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसून येत आहे.