Tue, Apr 23, 2019 19:45होमपेज › Solapur › मोहोळमध्ये कडकडीत बंद

मोहोळमध्ये कडकडीत बंद

Published On: Jan 16 2018 2:17AM | Last Updated: Jan 15 2018 9:12PM

बुकमार्क करा
मोहोळ : प्रतिनिधी

महाराष्ट्राचे राष्ट्रपुरुष व मराठा समाजबांधवांची बदनामी करणारी चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याच्या निषेधार्थ मोहोळ शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज व इतर मराठा समाज संघटनांनी आज स्वयंस्फूर्तीने मोहोळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या बंदला मोहोळ शहर व तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

कोणताही अनुचित प्रकार न घडता अत्यंत शांततेत हा बंद पाळून व्यापारीबांधवांनी आपला सहभाग नोंदवला. जिल्हा पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी शहर व तालुक्यात चोख बंदोबस्त ठेवला होता. याबाबत रविवार, 14 जानेवारी रोजी अज्ञात व्यक्तीविरोधात मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील बाजारपेठ बंद असली तरी बससेवा सुरळीत सुरू होती. शाळा व महाविद्यालये जरी सुरू असले तरी विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत कमी होती. शिवाजी चौकातील सिटी बस थांब्याला बंदोबस्त नियुक्त करण्यात आला होता. शहरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांची बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली होती. सोलापूर विभागीय कार्यालयातूनही बंदोबस्तासाठी अनेक पोलिस कर्मचारी मोहोळमध्ये नियुक्त करण्यात आले होते.  पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के  हे दिवसभर शासकीय वाहनाद्वारे पेट्रोलिंग करुन सर्वांना शांततेचे आवाहन करत होते. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रीतमकुमार यावलकर हे सकाळी 9 वाजताच मोहोळमध्ये दाखल झाले होते. दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार न घडता हा बंद अत्यंत शांततेत पार पडला. 

याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मोहोळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के हे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत. 
राष्ट्रपुरुषांचा अवमान केल्याच्या घटनेचा निषेधार्थ सामवारी मोहोळ बंदची हाक दिल्याने सर्वांनी मोहोळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सकल मराठा समाजाची बैठक 

तत्पूर्वी रविवारी सायंकाळी सात वाजता मोहोळ शहरातील कै. शहाजीराव पाटील सभागृहात मोहोळ तालुका सकल मराठा समाजाची बैठक झाली होती. त्यानंतर मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मोहोळसह संपूर्ण जिल्ह्यात सकल मराठा समाजबांधवांची जिल्हा बैठक होणार आहे. त्यानंतर या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठाबांधवांच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले आहे. यावेळी सकल मराठा समाजाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडू न देता शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.