Wed, Apr 24, 2019 21:36होमपेज › Solapur › सराफाची अडीच लाखांची दागिन्यांची बॅग पळवली

सराफाची अडीच लाखांची दागिन्यांची बॅग पळवली

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 16 2018 10:57PM
मोहोळ : वार्ताहर
  मोहोळ शहरातील एका सराफाची सोने-चांदीच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली. सदर बॅगमध्ये तब्बल अडीच लाख रुपयांचा ऐवज होता. ही घटना मंगळवारी 14 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता सिद्धार्थ नगर, मोहोळ येथे घडली. याप्रकरणी रात्री उशीरा मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

 याबाबत सविस्तर वृत्त असे की, संजय श्रीहरी दीक्षित यांचे मोहोळ शहरातील सिद्धार्थ नगर परिसरात गुरुकृपा नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. दुकानातील मौल्यवान दागिने ते येताना हॅन्डबॅगेत भरून घरी घेऊन येतात. मंगळवारी 14 ऑगस्ट रोजी त्यांचा मुलगा सदरची बॅग घेऊन दुकान उघडण्यासाठी गेला. त्यावेळेस त्याने दुकान उघडून सदर बॅग लोखंडी शटरजवळ ठेऊन साफसफाई सुरू केली. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने सुमारे अडीच लाख रुपयांच्या सोने- चांदीच्या दागिन्यांची बॅग लंपास केली. बॅगमधील कपाटाची चावी काढण्यासाठी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

याप्रकरणी रात्री उशिरा मोहोळ पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अन्वर मुजावर हे करीत आहेत. मात्र सलग दुसर्‍या दिवशी शहरातील सराफांच्या चोरीच्या घटनांमुळे सराफ व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, गुरुवारी 16 ऑगस्ट रोजी मोहोळचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी शहरातील सराफ व्यावसायिकांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व व्यावसायिकांनी आपल्या दुकानात क्लोज सर्कीट कॅमेरे बसवा, संशयित व्यक्ती आढळल्यास त्वरीत पोलिसांना संपर्क करा, त्यामुळे शहरातील चोर्‍यांचे प्रमाण कमी करता येईल, असे आवाहन केले. 

या बैठकीत सोनार समाजाचे जिल्हाध्यक्ष अमोल महामुनी, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय मोहरे, सचिन महामुनी, महेश पंडित, बालाजी वेदपाठक, पिंटू भोयरेकर, सुहास पंडित, वैभव विभुते, किरण पोतदार, जवाहर विभुते, योगेश तपासे, राजेश दीक्षित आदींसह व्यावसायिक उपस्थित होते. यावेळी असोसिएशनतर्फे पोलिस प्रशासनास निवेदन देण्यात आले.