Fri, Apr 26, 2019 09:38होमपेज › Solapur › ‘सरकार आमचं, पण चालतंय तुमचं’; नेत्याची खंत

‘सरकार आमचं, पण चालतंय तुमचं’; नेत्याची खंत

Published On: Feb 05 2018 11:00PM | Last Updated: Feb 06 2018 11:57AMमाढा : मदन चवरे 

‘सरकार आमचं, पण चालतंय तुमचं’ अशा शब्दात माढा तालुका भाजपचे अध्यक्ष संजय कोकाटे यांनी राष्ट्रवादीचे आ. बबनदादा शिंदे यांना उद्देशून खंत व्यक्त केली. कुर्डुवाडी येथे आयोजित जाहीर कार्यक्रमात केल्या गेलेल्या या वक्तव्यांमुळे सरकारमधील भाजपचे मंत्रीच राष्ट्रवादीच्या काहींना पूरक भूमिका घेत असल्याने जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांची होणारी भावनिक कोंडी जाहीरपणे व्यक्‍त झाल्याची चर्चा याठिकाणी उपस्थित सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.

कुर्डुवाडी येथे चार फेब्रुवारी रोजी शहाजहान शेख स्मृती  प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित पत्रकारांच्या पुरस्कार सन्मान सोहळ्यात भाजपचे तालुकाध्यक्ष संजय कोकाटे यांनी हे वक्तव्य करत कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद जाहीरपणे मांडली. याआधी 26 जानेवारी रोजी स्व. प्रभाकर दीक्षित यांच्या स्मृती प्रतिष्ठानने पत्रकारांना पुरस्कार देऊन गौरवले होते. त्या कार्यक्रमात काँग्रेसचे नेते माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील त्यांच्या साखर कारखान्यात गाळपासाठी येणार्‍या उसास पहिला हप्ता दोन हजार चारशे दिला म्हणून संजय कोकाटे यांनी त्यांचे जाहीर आभार मानले होते. या आभार मानण्यामागील कोकाटे यांची भावना या कार्यक्रमात उपस्थित आ. बबनदादा शिंदे यांना उसाच्या पहिल्या हप्त्याबाबत डिवचणारी अशीच होती. संजय कोकाटे यांच्या त्या वक्तव्याचा त्याच कार्यक्रमात समाचार घेत आ. शिंदे यांनी त्यांना तुमचे सरकार आहे. साखरेच्या दरातील घसरण थांबविण्यासाठी सरकारला सांगून काहीतरी उपाययोजना कराव्यात, म्हणजे उसाला चांगला दर देता येईल, असा उपरोधिक टोला लगावला होता.

या आ. शिंदे यांच्या उपरोधिक टोल्याला कोकाटे यांनी आठ दिवसांच्या फरकाने कुर्डुवाडी येथे आयोजित दुसर्‍या पत्रकारांच्या कार्यक्रमात उत्तर दिले. या उत्तराने मात्र अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. 
केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर जिल्ह्यातील राजकारणाने रंग बदलला. राष्ट्रवादीचे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असलेल्या वर्चस्वाला छेद देण्याचा प्रयत्न भाजपाकडून होणार हे निश्‍चित असल्याने राष्ट्रवादीचे आ. बबनराव शिंदे यांनी मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याशी सलगी साधत सरकारमधून आपली कामे कौशल्याने मार्गी लावली. या दरम्यान आ. शिंदे यांनी आपल्या या संबंधाचा राजकीय फायदा पण उचलला, स्वतःच्या भावाला त्यांनी अपक्ष निवडून आणत भाजपच्या मदतीने थेट जिल्हा परिषदचे अध्यक्ष केले. भाजपला मदत करणार्‍या अदृश्य हातापैकी एक आ. शिंदे असावेत, अशा चर्चाही काही काळ रंगल्या. आ. शिंदे यांचे बंधू जि.प. अध्यक्ष संजयमामा शिंदे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असेही चर्चिले गेले. पण झाले काहीच नाही. आ. शिंदे यांनी स्वतःची कामे मात्र पूर्ण करून घेतली. माढा तालुक्यात भाजप वाढू नये, अशी काळजी घेतली. असे असताना आ. शिंदे यांचे कडवे विरोधक असलेले कोकाटे यांनी भाजपला एक एक तगडा कार्यकर्ता जोडण्याचे काम सुरूच ठेवले. पण आपल्याच पक्षाच्या पालकमंत्र्यांकडून राष्ट्रवादीच्या आ. शिंदे यांना दिली जाणारी ताकद पाहून कोकाटे यांच्या मनीचे बोल ओठावर आले असल्याची चर्चा तालुकाभर रंगली आहे.