होमपेज › Solapur › श्री विठ्ठलाचे दर्शन ही भाग्याची गोष्ट : मोहन भागवत

श्री विठ्ठलाचे दर्शन ही भाग्याची गोष्ट : मोहन भागवत

Published On: Jan 19 2018 2:01AM | Last Updated: Jan 18 2018 10:47PMपंढरपूर  : प्रतिनिधी

श्री विठ्ठलाचे दर्शन घडणे ही जन्मजन्मांतरीच्या भाग्याची गोष्ट आहे, असे  प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. संत संमेलनानिमित्त बुधवारी रात्री पंढरीत आलेल्या मोहन भागवत यांनी गुरूवारी सकाळी 8 वाजता श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी भागवत यांचा शाल, श्रीफळ आणि श्री विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा भेट देऊन भागवत यांचे स्वागत केले.

यानंतर बोलताना मोहन भागवत म्हणाले की, पांडुरंग हे जगभरात भक्‍तीचे दैवत म्हणून ओळखले जाते. पांडुरंग नेहमीच सर्वांना बळ देत आला आहे. पांडुरंगाने सर्व संत आणि भाविकांचा मेळ घडवून आणत भक्‍तीचे मोठे अधिष्ठान निर्माण केले. धर्म हा देखील अध्यात्म आणि प्रपंच यांची सांगड घालत असतो. अशा धर्मप्रसाराचे कार्य या ठिकाणांहून घडावे असे सांगून, पंढरपूरच्या विकासासाठी जेथे जेथे आमची मदत लागेल तेथे तेथे आम्ही मदतीसाठी तत्पर असू अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी डॉ. भोसले यांनी मंदिर समितीमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा संक्षिप्त आढावा घेतला. याप्रसंगी मंदिर समितीचे सदस्य गहिनीनाथ औसेकर महाराज, भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, श्रीमती शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, सचिन अधटराव, प्रांताधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर, संघाच्या कुटुंब प्रबोधन गतीविधीचे राष्ट्रीय संयोजक प्रा. डॉ. रवींद्र जोशी, संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचारक विजयराव पुराणिक, पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेश जाधव, पुणे विभाग संघचालक संभाजी गवारे, सोलापूर जिल्हा संघचालक माधव मिरासदार आदी मान्यवर उपस्थित होते.

मंदिर समितीचे कार्य उत्कृष्ट
 मंदिर समितीच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत मोहन भागवत यांनी, मंदिर समितीचे उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले. पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणारा भाविक हादेखील पांडुरंगाचेच रूप असून, त्याची सेवा कशी करावी किंवा त्याच्याशी कसे वागावे याचे  प्रशिक्षण कर्मचार्‍यांना देण्याचा प्रयत्न वाखाणण्यासारखा असून मंदिर समितीचे कार्य उत्कृष्ट आहे असेही भागवत म्हणाले.