Mon, Mar 25, 2019 13:15होमपेज › Solapur › तुळजाभवानी देवस्थाच्या जमिनी हडपणारे मोकाट : क्षीरसागर 

तुळजाभवानी देवस्थाच्या जमिनी हडपणारे मोकाट : क्षीरसागर 

Published On: Dec 20 2017 3:47PM | Last Updated: Dec 20 2017 4:12PM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी 

तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात श्री तुळजाभवानी देवस्थानाची सुमारे २६५ एकर जमीन बेकायदेशीररित्या  ७७  लोकांच्या नावे करण्यात आली आहे.  मंदिरातील दानपेटीतील लिलावात भ्रष्टाचार करून काही कोटी रुपयांहून अधिक संपत्तीची लयलूट केलेली आहे. या प्रकरणी ६ वर्षे झाली, तरी सीआयडी चौकशी पूर्ण होत नाही. दिनांक ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत चौकशी अहवाल सरकारला सादर करण्याविषयी प्रतिज्ञापत्र पोलिस उपमहानिरीक्षक जय जाधव यांनी उच्च न्यायालयात सादर करूनही तो घोटाळ्याचा अहवाल का सादर केला जात नाही. हा घोटाळ्याचा अहवालच न दडपता शासनाने याप्रकरणी सर्व दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी. अन्यथा राज्यात प्रखर आंदोलन करावे लागेल, असा इशारा कोल्हापूरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज नागपूर विधान भवनाच्या पाय-यांवर आंदोलन करतांना दिला.

श्री तुळजापूर देवस्थानच्या मालकीच्या एकूण 3 हजार 568 एकर जमीनीपैकी अमृतवाडी येथील 265 एकर जमीन दिनांक 20 जुलै 2008 रोजी बेकायदेशीररित्या फेरफार करून ती 77 लोकांच्या नावावर करण्यात आल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी उघडकीस आणले. याचा विधी व न्याय खात्याने तयार केलेला चौकशी अहवाल नंतर महसूल खात्याने दडपून टाकला आहे. ते अहवाल सापडत नसल्याचे सांगत आहेत.

त्याचबरोबर तुळजापूर देवस्थानच्या दानपेटीच्या लिलावात मोठा घोटाळा संघटितरित्या करण्यात आला आहे. याविषयी सन 2010 मध्ये शासनाच्या चौकशीत असे लक्षात आले की, देवस्थानचे एका वर्षाचे सरासरी उत्पन्न साधारण 4 कोटी 63 लाख रुपये आहे; परंतु दानपेटीचा लिलाव केवळ 2 कोटी 67 लाख रुपयांना देण्यात आला होता. म्हणजे वर्षाला 2 कोटी रुपयांचा तोटा देवस्थानला झाला आहे. अशा प्रकारे वर्ष 1991 से वर्ष 2010 पर्यंत म्हणजे 20 वर्षांत अंदाजे 40 कोटीहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार दानपेटीच्या माध्यमातून झाला आहे. यात काही जिल्हाधिकारी, तहसिलदार, लोकप्रतिनिधी व कंत्राटदार गुंतलेले आहेत. बडे अधिकारी असल्यामुळे जवळजवळ 23 अधिकार्‍यांची चौकशी होऊनही कोणावरही कारवाई होत नाही.तरी शासनाने दोषींवर कठोर कारवार्इ करावी,अशी आमची मागणी आहे., असेही त्यांनी सांगितले.