Sun, May 26, 2019 11:14होमपेज › Solapur › आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे

आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे

Published On: Mar 01 2018 12:53AM | Last Updated: Mar 01 2018 12:53AMपंढरपूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषद निवडणूक प्रचारात सैनिक पत्नीविषयी वादग्रस्त वक्‍तव्य केल्याबद्दल विधान परिषदेचे भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांना करण्यात आलेले दीड वर्षाचे निलंबन विधिमंडळाच्या समितीने बुधवारी अखेर मागे घेतले आहे. 

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात भोसे ( ता. पंढरपूर ) येथे जिल्हा परिषद निवडणूक प्रचार सभेत बोलताना आ. प्रशांत परिचारक यांचा तोल गेला आणि त्यांनी अनावश्यकरीत्या सैनिक पत्नीविषयी वादग्रस्त वक्‍तव्य केले होते. त्या वक्‍तव्यामुळे राज्यभरात प्रचंड गदारोळ निर्माण झाला होता. आजी-माजी सैनिक, सैनिक संघटना, विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी रस्त्यावर उतरून आ. परिचारकांचा निषेध केला होता. तसेच परिचारकांना विधान परिषदेतून बडतर्फ करण्याचीही मागणी केली होती. या वादानंतर आ. परिचारक यांनी केलेल्या वक्‍तव्याबद्दल दिलगिरी व्यक्‍त केल्यानंतरही जनक्षोभ कमी होत नसल्याचे पाहून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय समिती स्थापन करून या वक्‍तव्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर लोकभावना लक्षात घेऊन आ. परिचारक यांना दीड वर्षाकरिता निलंबित करण्याचा निर्णय विधिमंडळ समितीने घेतला होता. दीड वर्षानंतर या कारवाईसंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्या समितीकडून सांगण्यात आले होते. 

दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होताच आ. परिचारक यांचे निलंबन मागे घेतले जावे याकरिता राजकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या होत्या. अधिवेशन सुरू झाल्यानंतर तीसर्‍याच दिवशी समितीने आ. प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्यात यावे अशी शिफारस सभागृहास केली होती.  आ. प्रशांत परिचारक यांनी  ते वक्‍तव्य केल्याचे कबूल केले असून केलेले वक्‍तव्य  सैनिकांचा आणि महिलांचा अपमान करण्याच्या हेतूने केले नव्हते असे सांगून दिलगिरी, खुलासा आणि क्षमा याचना व्यक्‍त केलेली आहे. त्यामुळे त्यांना आतापर्यंत दिलेली शिक्षा पुरेशी असल्याचे मत नोंदवून हे निलंबन मागे घेण्याची शिफारस समितीने केली आहे. त्यानुसार बुधवारी आ. प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेतल्याचे जाहीर करण्यात आले आहे.