Sat, Jul 20, 2019 02:30होमपेज › Solapur › निष्क्रिय निष्ठावंतांमुळे आ. परिचारक गटाच्या वाढीस ब्रेक

निष्क्रिय निष्ठावंतांमुळे आ. परिचारक गटाच्या वाढीस ब्रेक

Published On: Sep 03 2018 1:42AM | Last Updated: Sep 02 2018 9:44PMमंगळवेढा : प्रा. सचिन इंगळे 

सत्तेचे अनेक राजमार्ग जवळ असतानादेखील जनमानसात आपली प्रतिमा अधिक सकारात्मक  करण्यासाठी सक्रीय झालेले आ. प्रशांत परिचारकांनी गेल्या काही दिवसांत मंगळवेढा तालुक्याला विकासकामाच्या बाबतीत झुकते माप देण्याच्या  दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र तालुक्यात लाभलेल्या निष्क्रिय कार्यकर्त्यांमुळे विस्तारात मर्यादा येत आहेत. त्यामुळे असे निष्ठावंत काय कामाचे अशी चर्चा आ. परिचारक समर्थकात सुरू आहे. 

कोणत्याही नेत्याला सर्वसामान्य जनमानसात आपली प्रतिमा आश्‍वासक करण्यासाठी चांगल्या कार्यकर्त्यांची गरज असते. म्हणून नेता हा व्यापक जनसंपर्कात राहणारे कार्यकर्ते जवळ करत असतो. पण मंगळवेढा तालुक्यात वर्षानुवर्षे राजकारण करीत आपली पोळी सोयीने भाजणारे काही ‘निष्क्रिय’ निष्ठावंत आ. प्रशांत परिचारक यांच्या बगलेला बसत असल्याने आजही परिचारक यांना मानणारे अंतरावर थांबून वेट अँड वॉचची भूमिका घेत आहेत. 

आ. परिचारक यांना आपले नेतृत्व मानणारे हे निष्ठावंत पूर्वाश्रमी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचे खंदे समर्थक होते आणि वीस वर्षे हे मंगळवेढ्यात काम करीत होते. आ. भारत भालके यांना अनेक नव्या दमाचे उत्साही धडाडीचे कार्यकर्ते मिळत गेले, तर हे ढोबळे समर्थक आ. परिचारक यांच्या वाड्यावर गेले आणि मंगळवेढ्याचे प्रमुख मार्गदर्शक झाले. निवडणुकीला जवळपास एक वर्षभराचा अवधी असताना तालुक्यातील विस्कटलेली गटबांधणी एकत्र करण्याच्या दृष्टीने  आ. प्रशांत परिचारक यांनी लक्ष घातले असून ग्रामीण भागात पहिल्यांदाच संपर्क कार्यालय काढून जनसंपर्क वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या जवळ बसणारे आणि लोकांना निवडणुकीच्या रिंगणात आणणारे असे हे निष्क्रिय निष्ठावंत पदर मोड न करण्याच्या सवयीमुळे आज तालुक्याच्या ग्रामीण  भागातील कार्यकर्त्यांना आणि नागरिकांच्या समस्या व न्याय आपल्या नेत्याकडे घेवून जात नाहीत. अनेकांना टोलवा-टोलवी करीत उडवा-उडवीची उत्तरे देतात, याची खुमासदार चर्चा तालुक्यात सुरू आहे. 

मागील विधानसभा निवडणुकीत  आ. परिचारक यांनी चांगली टक्कर दिली. पराभवाने खचून न जाता थोड्याच दिवसांत विधानपरिषद निवडणुकीत आमदारकी मिळवून जोरदार पुनरागमन केले. काही गावात ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवण्यात देखील यश आले. मरवडे येथे संपर्क कार्यालय सुरू केले. मात्र राजकीय गोतावळा वाढवणे हे स्थानिक कार्यकर्त्यांचा कामाचा भाग असतो. जो काही जनसंपर्क आहे, तो पंढरपूर अर्बन बँक, युटोपियन शुगर्स आणि जिल्हा दूध संघाशी निगडीत आहे. 

त्यामुळे आ. परिचारक  यांनी सोबत असणारे निष्ठावंत किती कार्यरत आहेत, याची तपासणी करणे आवश्यक आहे. मंगळवेढ्याच्या रखडलेल्या प्रश्‍नांकरिता स्थानिक समर्थकांनी लक्ष घालून आपल्या नेत्याकडे पाठपुरावा करणे आवश्यक असते. मात्र नेता मंगळवेढा दौरा करणार त्यादिवशी सक्रीय होणारे हे पदाधिकारी गटासाठी डोकेदुखी ठरत आहेत. गेल्या सहा वर्षांपासून आ. परिचारक यांच्यासोबत सावलीप्रमाणे असणारे हे पदाधिकारी आपल्या नेत्याला किती यश मिळवून देऊ शकले, किती नवे कार्यकर्ते जोडून दिले यावर कधीही प्रयत्नशील नसतात. अशीच परिस्थिती येत्या काळात राहिल्यास जुन्याच कार्यकर्त्यांच्या गराड्यात असलेले आ. परिचारक पुन्हा एकदा मंगळवेढ्यात आपले वजन वाढवण्यात अपयशी ठरतील, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.