होमपेज › Solapur › उरलेले आयुष्य धनगर समाजाला आरक्षणासाठी खर्ची घालणार

उरलेले आयुष्य धनगर समाजाला आरक्षणासाठी खर्ची घालणार

Published On: Apr 15 2018 11:02PM | Last Updated: Apr 15 2018 9:05PMकोल्हापूर: प्रतिनिधी

कष्टकरी लोकांचे राज्य येण्यासाठी गेली 55 वर्षे महाराष्ट्र विधानसभेत प्रतिनिधित्व करताना राजकीय, सामाजिक आयुष्य खर्ची घातले, आता उरलेले संपूर्ण आयुष्य धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी घालवणार आहे, मग त्यासाठी कोणतीही किंमत द्यायला मी तयार आहे, अशी प्रतिज्ञा ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी केली. 

यशवंत युवा सेनेतर्फे आ. देशमुख यांना यशवंतराव होळकर जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. घोंगडे, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. सत्काराला उत्तर देताना देशमुख यांनी शाहू महाराजांच्या भूमीत पुरस्कार स्वीकारला याचा खूप अभिमान वाटत असल्याचे नमूद केले. अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रकाश शेंडगे होते. 

आ. देशमुख म्हणाले, कष्टकर्‍यांना सुखाचे दिवस यावेत हे सूत्र घेऊन मी समाजकारण, राजकारणात आलो. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असे दोन कालखंड मी पाहिले. पण स्वातंत्र्यावेळी कष्टकर्‍यांचे सुखाचे पाहिले दिवस अजूनही आलेले नाहीत याची खंत वाटते, पण ती एकदिवस नक्की येतील यावर माझा ठाम विश्‍वास आहे. दुष्काळ निवारणासाठी टेंभू, म्हैसाळ योजना आणण्यात मी पुढाकार घेतला. यासाठी अजून काम करण्याची प्रेरणा या पुरस्कारातून मिळाली आहे. 

धनगर समाज राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात अजूनही मागासलेलाच आहे. त्याला आरक्षणाची नितांत गरज आहे, पण आरक्षणाच्या सर्वत्र दैना आहे. त्यासाठी एकट्या विधानसभेत लढून चालत नाहीत. त्यासाठी जनरेट्याचे प्रचंड सामर्थ्य उभे करावे लागते. आपण ते एकीच्या बळावर उभे करू असे आवाहनही आमदार देशमुख यांनी केले. 

माजी आमदार प्रकाश शेंंडगे म्हणाले, आतापर्यंत आरक्षणावरुन समाजाची फसगत झाली असल्याने आम. देशमुखांनी ब्रम्हास्त्र बाहेर काढून आरक्षण मिळवून द्यावे असे आवाहन केले. तसेच सरकारला आश्‍वासनाची आठवण करुन देण्यासाठी लवकरच मंत्रालयासमोर 40 ते 50 हजार ढोल वाजवून धनगरांची ताकद दाखवू असे आवाहन केले. याला उपस्थितांनी हात उंचावत मान्यता दिली. 

यावेळी डॉ. अमोल रणदिवे यांचा पोवाडा, उचगावच्या मंगोबा ओवीकार मंडळाच्या धनगरी ओव्या, पट्टणकोडोलीच्या पथकाचे गजनृत्य आदि कार्यक्रमांनी यशवंत महोत्सवात रंग भरले. स्वागत व प्रास्ताविक विवेक कोकरे यांनी केले. यावेळी  माजी आमदार संपतबापू पाटील, भूषण होळकर, रेणुका शेंडगे, शिवाजी दळनार, प्रवीण काकडे, कल्लाप्पा गावडे, बबन रानगे, अमरजित बारगर, अशोक कोळेकर आदी उपस्थित होते.