Sat, Apr 20, 2019 10:14होमपेज › Solapur › खा. अमर साबळे यांनी लोकसभा उमेदवारी घ्यावी

खा. अमर साबळे यांनी लोकसभा उमेदवारी घ्यावी

Published On: Dec 27 2017 1:21AM | Last Updated: Dec 26 2017 11:01PM

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे यांच्याबाबत सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजी असतानाच आता खुद्द पंढरपूरच्या भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांमध्येही बनसोडे यांच्याविषयी नाराजी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खा. अमर साबळे यांनी उमेदवारीची मागणी करावी आणि लढावे, अशी गळ पंढरपूरच्या भाजप कार्यकर्त्यांनी खा. साबळे यांना घातली आहे. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी या किल्ल्यावर भाजपनेही आपला झेंडा 3 वेळा फडकावला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पावणेदोन लाख मतांच्या फरकाने पराभव करून खा. शरद बनसोडे निवडून आलेले आहेत. मात्र त्यानंतर त्यांनी मतदारसंघात कसलाच संपर्क ठेवलेला नाही. विशेषत: पंढरपूर, मोहोळ आणि मंगळवेढा तालुक्यांकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केलेले आहे. त्यांच्या निधीतून पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यांत एकही काम उभे राहिल्याचे दिसून आलेले नाही. एवढेच नाही तर वर्ष, सहा महिन्यांत ते पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळसारख्या शहरातही भेटत नाहीत. ग्रामीण भागात त्यांना लोक विसरूनही गेले आहेत. आजवर पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार संदीपान बनसोडे हे सर्वात निष्क्रिय खासदार मानले जात होते. मात्र अ‍ॅड. बनसोडे यांनी संदीपान थोरात यांच्यापेक्षाही जास्त निष्क्रियता दाखवल्याचे बोलले जात आहे. 

खा. शरद बनसोडे यांच्या प्रयत्नांमुळे पंढरपूर शहरात एकही काम गेल्या साडेतीन वर्षांत झालेले नाही. ग्रामीण भागात एकही योजना, रस्ता, हायमास्ट दिवा, पिकअप शेड उभे राहिलेले नाही. एवढेच नाही तर ते लोकांना आणि कार्यकर्त्यांना भेटतही नाहीत. सोलापूर शहर आणि आसपासच्या भागात त्यांचा अधून-मधून संपर्क असल्याचे वर्तमानपत्रांतून दिसून येते. त्याव्यतिरिक्‍त खा. बनसोडे यांनी उर्वरित मतदारसंघाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे.

खा. बनसोडे यांच्या या निष्क्रियतेबाबत आता सर्वसामान्य जनता भाजप कार्यकर्त्यांना जाब विचारू लागले आहेत. कुठे आहेत तुमचे खासदार, अशी विचारणा केली जाऊ लागली आहे. खुद्द भाजप कार्यकर्त्यांनाही खासदारांचे दर्शन दुर्मीळ झालेले आहे. त्यांच्या खासदारपदाचा लाभ पंढरपूर विभागाला झालेला नाही तसाच भाजपला आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांतूनच अस्वस्थता पसरली आहे. 

यातूनच राज्यसभा सदस्य खा. अमर साबळे यांनी आगामी निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारीची मागणी करावी, अशी गळ कार्यकर्त्यांनी त्यांना पंढरपूर दौर्‍यावर आल्यानंतर घातली आहे. खा. अमर साबळे यांनी  येथून पक्षाकडे उमेदवारी मागावी आणि त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करू, असे उघडउघड वक्‍तव्य भाजपच्या कार्यकर्त्यांनीच केले आहे. यावरून खा. बनसोडे यांच्याविषयीची नाराजी किती खोलवर रूजली असल्याचे दिसून येत आहे.