Fri, Mar 22, 2019 01:33
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › सुभाष देशमुख यांचा बंगला बेकायदेशीर; आयुक्तांचा कोर्टात अहवाल

सुभाष देशमुख यांचा बंगला बेकायदेशीर; आयुक्तांचा कोर्टात अहवाल

Published On: Jun 02 2018 11:57AM | Last Updated: Jun 02 2018 12:36PMसोलापूर : पुढारी ऑनलाईन

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा अग्निशमन दलाच्या आरक्षित जागेवर बांधलेल्या बंगल्याचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचा अहवाल महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला आहे. या अहवालामुळे देशमुख यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. देशमुख यांचा सोलापूरमध्ये टोलेजंग बंगला आहे. तो आरक्षित जागेत बांधला असून ती जागा महापालिकेच्या अग्निशमन विभाग, व्यापारी गाळ्यांसाठी देण्यात आली होती. 

होटगी रोडवरील अग्निशमन दलाच्या आरक्षित जागेवर बांधलेला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा  बंगला बेकायदेशीर असल्याची तक्रार नितीन चव्हाण यांनी न्यायालयात दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने 31 मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते.त्यानुसार मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांचा उच्च न्यायालयात अहवाल सादर केला असून त्यामध्ये सदरचे बांधकाम आरक्षित जागेवर असल्याने बांधकाम परवाना रद्द केल्याचा अहवाल सादर दिला आहे. विशेष म्हणजे हा अहवाल सादर करून आयुक ढाकणे रजेवर गेले आहेत. या अहवालामुळे सुभाष देशमुख यांच्यापुढील अडचणी वाढणार असल्याचे मानले जात आहे.

काय म्हणाले सुभाष देशमुख 

या संदर्भात बोलताना, दोषी आढळल्यास मंत्रीपदावरून दूर होईन. तसेच बंगला बेकायदेशीर असल्यास स्वखर्चाने जमीनदोस्त करेन, अशी प्रतिक्रिया सुभाष देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

‘हा महापालिकेचा दोष आहे. रोख पैसे भरुन परवाना घेतला आहे. आता महापालिका अधिकाऱ्यांनी परवाना कसा दिला. आम्ही परवान्यानुसार बांधकाम केले असल्याचेही सुभाष देशमुख म्हणाले.

२६ पानी अहवाल 
आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेला अहवाल हा २६ पानी आहे. यामध्ये सुभाष देशमुख यांनी आरक्षित जागेवर बांधकाम केल्याचा अहवाल पालिका आयुक्तांनी उच्च न्यायालयात सादर केला. या 26 पानी अहवालात सुभाष देशमुखांच्या बांधकामावर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. 

कसा आहे सुभाष देशमुखांचा ‘महाल’

सुभाष देशमुख यांनी दोन एकराच्या जागेत सहकार मंत्री सुभाष देशमुखांचा प्लॉट 22 हजार 243 स्क्वेअर फुटांचा आहे. त्यावर त्यांनी 9425 स्क्वेअर फूट बांधकामाची अधिकृत परवानगी घेतली. पण प्रत्यक्षात तीन पट जास्त बांधकाम झाल्याचा अंदाज आहे. महापालिकेने बाराशे स्क्वेअर फुट बांधकामाची  परवानगी दिली असताना देशमुखांनी ७ हजार स्क्वेअर फुटांवर हा महाल उभा केला आहे. 
 

देशमुखांनाही क्लिन चीट देतील का? धनंजय मुंडेचा सवाल 

भाजप सरकारच्या या अशा मंत्र्यांना एक मिनीटही मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही. यासंदर्भातील बैठका होऊ दिल्या नाहीत. सरकारच्या वतीने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता या प्रकरणात मुख्यमंत्री काय करणार याकडे लक्ष आहे, अशी प्रतिक्रीया विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिली. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. देशमुखांनाही क्लिन चीट देतील का? असा सवालही धनंजय मुंडेनी उपस्थित केला. 

इतर मंत्र्यांप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देशमुखांनाही क्लिन चीट देतील का? सामान्य जनतेला जे नियम आहेत तेच मंत्र्यांना देणार का ? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. देशमुखांचा टोलेजंग बंगला जमिनदोस्त करून ताब्यात घ्यावा, असेही मुंडे म्हणाले. 

आम्ही गेल्या अधिवेशनात हा विषय मांडला होता. आता येणाऱ्या पावसाळी अधिवेशनातही हा विषय मांडणार आहोत.आम्ही शांत बसणार नाही. देवेंद्र फडणवीस सरकार पारदर्शकतेच्या बाता करते. हिच पारदर्शकता आहो का? असा सवालही मुंडेंनी केला. 

वाचा :

खुर्चीचा मोह नाही; दोषी असल्यास मंत्रीपद सोडेन!

देशमुखांचा बंगला अनधिकृत निर्णय देऊन आयुक्त रजेवर!