होमपेज › Solapur › शहीद मेजर कुणाल गोसावी स्मृतिदिनानिमित्त पंढरपुरात स्वाभिमान रॅली

शहीद मेजर कुणाल गोसावी स्मृतिदिनानिमित्त पंढरपुरात स्वाभिमान रॅली

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

अतिरेक्यांशी लढत असताना शहीद झालेले पंढरपुरातील मेजर कुणाल मुन्नागिर गोसावी यांचा प्रथम स्मृतिदिन पंढरपूर भाजपाच्यावतीने स्वाभिमान दिन म्हणून पाळला जाणार असून त्यानिमित्ताने बुधवार (दि. 29 नोव्हेंबर) रोजी पंढरपुरातून भव्य स्वाभिमान रॅली काढली जाणार आहे, अशी माहिती भाजपाचे शहर सरचिटणीस संजय वाईकर यांनी दिली.

गेल्या वर्षी 29 नोव्हेंबर रोजी सीमेवर पाक दहशतवाद्यांशी सामना करत असताना पंढरपूरचे सुपूत्र कुणाल गोसावी हे रणांगणावरच धारातीर्थी पडले. त्यांनी राष्ट्रासाठी आपले बलिदान दिले. या वीराच्या स्मृती पंढरपूरकरांमध्ये आजही जागृत आहेत. शहीद कुणाल गोसावी यांच्या या स्मृतीदिनानिमित्त पंढरपूर शहर भाजपाच्या वतीने बुधवार दि. 29 रोजी सकाळी 7.30 वा. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यापासून स्वाभिमान रॅलीला सुरुवात होणार आहे.  या रॅलीची सांगता गोपाळकृष्ण मंदिराजवळ होणार आहे. या ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या शामियानामध्ये शहीद कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी उमा गोसावी  यांचा  गौरव केला जाणार आहे. 

या सर्व कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व शहीद गोसावी या पंढरपूरच्या वीरपुत्राचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहावी, असे आवाहन शहर भाजपाचे सरचिटणीस संजय वाईकर यांनी केले आहे.