Tue, Apr 23, 2019 14:04होमपेज › Solapur › बाजार समिती निवडणुकीस विलंब?

बाजार समिती निवडणुकीस विलंब?

Published On: Feb 11 2018 10:41PM | Last Updated: Feb 11 2018 9:02PMसोलापूर : प्रतिनिधी 

सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी प्रारुप मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरु झाले असले तरी अद्याप प्रारुप मतदार याद्या तयार झालेल्या नाहीत. त्यावरील हरकती आणि सुनावणी यासाठी काही कालावधी जाणार आहे. त्यामुळे न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे 16 एप्रिलपर्यंत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होईल याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे यासाठी मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची चर्चा आहे.

बार्शी आणि सोलापूर बाजार समित्यांच्या निवडणुकीच्यादृष्टीने करण्यात येत असलेल्या प्रक्रियेबाबत सहकार प्राधिकरणाने माहिती मागविली आहे. सर्व माहिती निवडणूक शाखेकडून दिली जाणार आहे. 
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बार्शी बाजार समितीची निवडणूक 11 मार्च आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक 16 एप्रिलपर्यंत घेणे अपेक्षित होते. मात्र प्रारुप मतदार याद्या तयार होण्यासाठीच मोठा विलंब लागत असून यासाठी शासनानकडून सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना करण्यात येत आहेत. त्यामुळे सुरुवातील सात-बारा नावावर असणार्‍या शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आला होता. आता सामायिक उतार्‍यावर नाव असणार्‍यांपैकी एकालाच मतदान करता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दुसरीकडे सुरुवातील कोणाचे नाव आहे त्यालाच मतदान करता येईल असे सांगण्यात येत असल्याने या निवडणुकीविषयी शेतकर्‍यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. 

येत्या बुधवारी सोलापूर बाजार समितीसाठी मतदारांची प्रारुप यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यावर हरकती मागविण्यात येणार असून त्यानंतर काही दिवसांतच या याद्या अंतिम करण्यात येणार आहेत. त्यामुळे या प्रक्रियेला विलंब होणार असल्याने बाजार समितीच्या निवडणुका वेळेत होतील का याविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असल्यानेच यासाठी मुदतवाढ मागण्यात येत असल्याचे समजते.