Wed, Mar 20, 2019 23:13होमपेज › Solapur › पूरंदावडेत नेत्रदिपक रिंगण सोहळा 

पूरंदावडेत नेत्रदिपक रिंगण सोहळा 

Published On: Jul 19 2018 1:39AM | Last Updated: Jul 18 2018 10:22PMमाळशिरस : अनंत दोशी

‘आता कोठे जावे मन, तुझे चरण देखलिया’ ! अशा शाश्‍वत सुखाचा आनंद देणारा स्वर्गालाही लाजवेल असा अनूपम्य गोल रिंगणाचा सोहळा पुरंदावडे येथे पार पडला. आज लाखो वैष्णवांनी हा सोहळा आपल्या डोळ्यात साठवून भक्‍तीचा आनंद सोहळा उपभोगला. सायंकाळी ढगाळ  साथ संगतीने माऊलींचा  सोहळा माळशिरस मुक्‍कामी विसावला. 

मंगळवारी जिल्ह्यात आगमन झालेल्या माऊलींचा पहिला मुक्‍काम नातेपुते येथे झाला. पहाटे प्रमुख विश्‍वस्त यांच्या हस्ते माऊलींची नैमित्तिक पूजा व आरती झाल्यानंतर सकाळी 6.30 वाजता माऊलींसह लाखो वैष्णवभक्‍तांनी नातेपुते नगरीचा निरोप घेतला. सुमारे एक ते दीड लाखांच्या पायदळासह  माऊलींच्या पालखी सोहळ्याने पहिल्या रिंगणासाठी पुरंदावडेकडे कूच केले.  दुपारचा नैवेद्य व विश्रांतीसाठी हा  सोहळा सकाळी नऊ वाजता मांडवे  ओढा येथे पोहोचला.

येथे माऊलींना दुपारचा नैवेद्य दाखविण्यात आला व वारकर्‍यांनी भोजन घेतले. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्यामुळे वारकर्‍यांमध्ये चैतन्याचे वातावरण दिसून येत होते. पुरंदावडेच्या रिंगण सोहळ्याची सर्वांना ओढ लागून राहिली होती. मांडवे ओढा येथे पालखी खांद्यावर घेण्यात आली. ती ओढ्याच्या दुसर्‍या काठावर आणण्यात आली. त्यानंतर पालखी रथात ठेवून दुपारी 12 वाजता  सोहळा सदाशिवनगरकडे मार्गस्थ झाला. पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवल्याने व वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवल्याने पालखी सोहळ्याला वाटचालीत कोठेच अडचण आली नाही. त्यामुळे दुपारी बरोबर अडीच वाजता  सोहळा पुरंदावडे येथील मैदानावर रिंगण सोहळ्यासाठी पोहोचला.

रिंगण सोहळ्यासाठी माऊलींचे अश्‍व पुरंदावडे हद्दीत  पोहोचले. त्यावेळी सरपंच  महादेव ढोपे . काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे , पद्मजादेवी मोहिते- पाटील , काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, तहसीलदार बी एस माने. नायब तहसीलदार काळे , भानुदास पाटील, उपसरपंच नंदा गरगडे यांच्यासह ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले. पाठोपाठ माऊलींचा रथ पोहोचला. भाविकांनी यावेळी दर्शनासाठी एकच गर्दी केली.

आखीव रेखीव रिंगण

पुरंदावडे येथील प्रांगणात गोल रिंगणासाठी मैदान तयार करण्यात आले होते. भोसरीच्या श्री स्वामी समर्थ आर्टिस्ट राजश्री जुन्नरकर हिने रिंगणाच्या मध्यभागी व गोलाकार नेत्रदीपक रांगोळी काढली होती.तर अश्‍वांच्या रिंगणाच्या मार्गावर रांगोळ्याच्या पायघड्या घातल्या होत्या. सुरुवातीला रथापुढील 1 ते 27 दिंड्या अश्‍वासह रिंगणात आल्या. त्यापाठोपाठ माऊलींची पालखी खांद्यावर घेऊन रिंगणात आणण्यात आली. रथापाठीमागील दिंड्या रिंगणसोहळ्यासाठी आत आणण्यात आल्या. चोपदारांनी पताकाधारी वारकर्‍याना रिंगणाच्या मध्यभागी घेतले. त्यानंतर रिंगणाला एक प्रदक्षिणा पूर्ण करून माऊलींची पालखी शामियानात आणण्यात आली.

नेत्रदिपक रिंगण सोहळा

पुरंदावडे येथील हा नेत्रदिपक रिंगण सोहळा आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी लाखो भाविक उपस्थित झाले होते. अश्‍वांची पूजा झाल्यानंतर जरीपटक्याच्या भोपळे दिंडीच्या ध्वजाने रिंगणाला 2 प्रदक्षिणा पूर्ण केल्या.  त्यानंतर चोपदारांनी अश्‍वांना रिंगण दाखविले. त्यानंतर स्वाराचा अश्‍व रिंगणासाठी सोडण्यात आला. त्याच्या पाठोपाठ माऊलींचा अश्‍व धावला आणि लाखो भाविकांनी ‘माऊलीऽ माऊलीऽऽ’ नामाचा एकच जयघोष सुरू केला. आणि या जयजयकारातच दोन्ही अश्‍वांनी नेत्रदीपक दौड करीत हा रिंगण सोहळा मोठ्या उत्साही व भक्‍तिमय वातावरणात पार पडला. गेले आठ वर्ष माऊलीचा हिरा हा अश्‍व रिंगण सोहळ्यात धावत होता परंतु त्याचे नुकतेच निधन झाल्याने यावर्षी नवीन अश्‍व रिंगण सोहळ्यात धावला.

नवीन अश्‍व रिंगण सोहळ्यात धावत असल्याने पोलिस व पोलिस मित्रांनी रिंगणाच्या दोन्ही बाजूनी सुरक्षा कवच केले होते . यावेळी अश्‍वांच्या टापाखालील माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली.रिंगण सोहळ्यानंतर दिंड्या दिंड्यामध्ये विविध खेळ रंगले. चोपदारांच्या निमंत्रणानंतर उडीच्या कार्यक्रमासाठी सर्व दिंड्या पालखीच्या सभोवती गोलाकार बसल्या. टाळ, मृदुंगाच्या साथीने आसमंत व्यापून टाकणारा नादब्रह्म सुरू झाला. सर्व वारकरी श्‍वास रोखून या नादब्रह्मात तल्लीन होऊन गेले होते. एकात्म भक्‍तीभावाचा हा शाश्‍वत सुखाचा सोहळा लाखो भाविकांनी अनुभवला.रिंगण व उडीच्या कार्यक्रमानंतर श्री ज्ञानेश्‍वर माऊलींचा पालखी सोहळा येळीव फाटा येथे विश्रांती घेऊन माळशिरसकडे मुक्‍कामासाठी मार्गस्थ झाला.