होमपेज › Solapur › मातंग समाजाला शिक्षा देतेय सरकार

मातंग समाजाला शिक्षा देतेय सरकार

Published On: Aug 06 2018 1:56AM | Last Updated: Aug 05 2018 9:25PMसोलापूर ः प्रतिनिधी 

अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळामध्ये ज्या व्यक्तींनी घोटाळा केला, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, मात्र त्यांच्या चुकीमुळे अवघे महामंडळ बंद करून मातंग समाजाचे आर्थिक पाठबळच काढून घेतल्याने समाजाची प्रगती पुन्हा ठप्प झाली आहे. त्यामुळे ही केवळ त्या आरोपींना शिक्षा नसून अवघ्या समाजालाच शिक्षा देण्याचे काम या सरकारने केले असल्याची टीका अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी केली.

अण्णा भाऊंचे कुटुंब समाजाच्या भेटीला या अभियानांतर्गत सचिन साठे यांनी राज्यातील विविध जिल्ह्यात संघटन बांधणी दौरा सुरू केला आहे. आज ते सोलापुरात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
सचिन साठे म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारकडून दलित समाजाला टार्गेट केले जात आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या कायद्यात शिथिलता आणली असल्याने समाजावर अन्याय झाला आहे. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत कुण्या पक्षाने आमच्यावर माणूस लादणे आता आम्हाला नको आहे. आम्ही आमचा माणूस स्वतंत्र शोधू अशी भूमिका त्यांनी घेतली. मात्र, नेमक्या कोणत्या पक्षाबरोबर आपण जाणार असे विचारल्यावर त्यांनी समाजात फिरल्यावर त्यांच्याकडून जे मत येईल त्यावरच निर्णय घेतला जाईल असे सांगत कोणत्याही पक्षाचे नाव जाहिर केले नाही.

एससी संवर्गात मातंग समाज सर्वात मोठा दोन नंबरचा समाज आहे. राज्यात तब्बल 58 लाख लोकसंख्या मातंग समाजाची आहे. तरी एससी संवर्गात या समाजाला डावलण्याचे काम सातत्याने होत आहे. शिवाय या समाजातून नवे नेतृत्व होऊच नयेत असा प्रयत्न प्रस्थापितांकडून केला जातो. त्यामुळे आता मातंग समाजातील माणसांचे नवे नेतृत्व निर्माण करण्यासाठी संघटनात्मक पातळीवर अभियान सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.