प्रचंड गर्दी पाहून पवार म्हणाले 'पंढरपूरचं ठरलेलं दिसतय' 

Last Updated: Oct 18 2019 8:16PM
Responsive image

Responsive image

पंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूरला यापुर्वी अनेकदा आलो आहे. पण आज वेगळेच चित्र दिसते. तुमचं ठरलय आहे असं दिसतय त्यामुळे निकाल नानाच्या (भारत भालेक) बाजूने लागणार आहे. राज्यभरात आघाडीच्या सभांना मोठ्या संख्येने तरूणाई येत आहे. त्यामुळे बापासोबत आता पोरंही आमच्याकडे आले आहेत. तरीही राज्याचे मुख्यमंत्री म्हणताहेत की निवडणुकीमध्ये दम नाही. त्यामुळे 24 तारखेला यांना लोकांचा मुड दिसेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. 

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे पंढरपूर मतदारसंघातील उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शिवाजी चौकामध्ये जाहीर सभा घेतली. सभेला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, लतीफ तांबोळी, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष राजूबापू पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिता नागणे, युवराज पाटील, सुभाष भोसले, अ‍ॅड. राजेश भादुले, संदीप मांडवे, किरण घाडगे, सागर यादव, अनिता पवार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना शरद पवार म्हणाले की, आम्ही आमच्या काळात राज्याचा नावलौकीक वाढविला. परंतू या सरकारने सर्वसामान्य जनतेला छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर फसविण्याचे काम केले आहे. ज्यांच्या काळात 16 हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या. ते आता छत्रपतींचा खोटा इतिहास तयार करत असून शौर्याचा वारसा असलेल्या किल्ल्यांमध्ये छमछम व दारू अड्डे सुरू करत आहेत. आम्ही सदैव शेतकर्‍यांना न्याय देण्याचे काम केले. परंतू सध्याचे सरकारच्या धोरणामुळे कारखानदारी वाढलेली नाही. नाशिकला पाच वर्षात अनेक कारखाने बंद पडले. निम्म्याहून अधिक आजारी पडले. 5 वर्षात सत्तेचा गैरवापर यांनी केला आहे. शासकीय यंत्रणा हाताशी धरून राजकीय पक्षांच्या कार्यालयांवरही धाड टाकण्याचे काम यांनी केले आहे. दिल्लीसोबत कसे लढायचे हे आम्हाला माहित आहे. परंतू राज्यात मी आता दाखवतोच. भारत नानांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे सांगत शरद पवार यांनी भाजप सरकावर जोरदार हल्लाबोल केला.

याप्रसंगी अ‍ॅड. राजेश भादुले, राजाभाऊ गुंड-पाटील, सुमित शिंदे, सागर यादव, श्रीकांत शिंदे, समाधान फाटे, संदीप मांडवे, शुभांगी भुईटे, किरण घाडगे, अनिल अभंगराव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर होलार, तेली समाजासह संभाजी बिग्रेड, आरपीआय, लोक कलावंत संघटना व अरूण कोळी यांनी भारतनाना भालके यांना आपला जाहीर पाठिंबा दिला. सभेला मोठ्या संख्येने तरूणाईसह अबालवृद असल्यामुळे शिवाजी चौक हाऊसफुल्ल झाला होता. चौकातील आसपासच्या इमारतींवरही मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.