होमपेज › Solapur › कौठाळी ग्रामसभेत तुफान हाणामारी

कौठाळी ग्रामसभेत तुफान हाणामारी

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 17 2018 8:56PMपंढरपूर : प्रतिनिधी

कौठाळी (ता. पंढरपूर) ग्रामपंचायतीच्या 15 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत अभूतपूर्व हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये शेकडो ग्रामस्थांनी हात धूवून घेतले आणि ग्रामपंचायत सदस्यांसह खूद्द सरपंचांनाही चोप दिला गेला. जाणीवपूर्वक खुर्च्या तोडल्या आणि मजबूत लोखंडी टेबल्सही महत्प्रयासाने तोडण्यात आले. पोलिसांनी विशेष कुमक मागवून परिस्थितीवर नियंत्रण राखण्यात यश मिळवले. 19 पेक्षा जास्त लोकांना पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून चौघांना अटक केली आहे. या हाणामारीने प्रशासनही अवाक् झाले असून या एकूणच प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. 

कौठाळी ग्रामपंचायतीची 15 ऑगस्ट निमित्त ग्रामसभेची नोटीस ग्रामसेवकांनी काढली होती. याच ग्रामसभेत तंटामुक्‍त समितीच्या अध्यक्षांचीही निवड होणार होती. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या नेत्यांनी तंटामुक्‍त समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या धरतीवर घरोघरी जाऊन प्रचार केला होता. ग्रामसभेच्या वेळी तंटामुक्‍त समितीची निवड होणार होती. तत्पूर्वी झालेल्या ध्वजारोहनाच्या कार्यक्रमास जेमतेम 25 ते 30 ग्रामस्थ होते मात्र जेव्हा ग्रामसभा सुरू झाली तेव्हा गावातील दोन्ही राजकीय गटांचे सुमारे 2 ते 3 हजार लोक उपस्थित होते. ग्रामसभा सुरू झाल्यानंतर मुरुमीकरणाच्या मुद्दयावरून वादाला सुरूवात झाली. जाब विचारणाराच्या मुस्कटात मारून या हाणामारीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर सरपंचांनाही गर्दीतच बेदम चोपण्यात आले. शेकडो लोकांनी एकाच वेळी एकमेकांवर हल्लाबोल केल्यामुळे कोण कुणाला हाणतय, कोण कुणाला ताणतय, शिवीगाळी करतंय काही कळायला मार्ग नव्हता. यावेळी ग्रामसभेसाठी मांडलेल्या खूर्च्या, टेबल्स मोडून, तोडून टाकण्यात आले. दणकट असलेले टेबल्स सहजा-सहजी तुटत नाहीत हे पाहून ते उचलून, उचलून आदळण्यात आले आणि पूर्णपणे तोडल्यानंतरच संबंधितांनी मोकळा श्‍वास घेतला.  या दरम्यान पाच-सात ग्रामपंचायत सदस्य आणि खूद्द सरपंचानाही बेदम चोप मिळाला होता. 

बंदोबस्तासाठी आलेले पोलिस हतबल होऊन सुरू असलेली हाणामारी पाहत होते. पंढरपूर ग्रामीण  पोलिस निरीक्षक अवचर यांना घटना समजताच ते जादाची कुमक घेऊन गावात बंदोबस्तासाठी तैनात झाले. उपविभागीय पोलिस अधीक्षक डॉ. सागर  कवडे हेसुद्धा गावात दाखल झाले. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी घोडके यांनीही गावात जाऊन झाल्या प्रकाराची माहिती घेतली. 

कौठाळीत झालेल्या या हाणामारीचा प्रकार वार्‍यासारखा संपूर्ण तालुकाभर पसरला असून अशा प्रकारे हाणामरा झाल्यामुळे आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. 

पोलिसांनी घटनेचे मोबाईलवर व्हिडीओ शुटिंग काढले असून त्या आधारे हाणामारीत सहभागी असलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.