Sat, Jul 11, 2020 22:11होमपेज › Solapur › विवाहितेचा छळ करून अधू केले; १३ जणांवर गुन्हा दाखल

विवाहितेचा छळ करून अधू केले; १३ जणांवर गुन्हा दाखल

Published On: Dec 21 2017 1:50AM | Last Updated: Dec 20 2017 10:46PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

खोटे  बोलून लग्न करून विवाहितेचा  छळ  करून  तिला कायमची अधू बनविल्याप्रकरणी पतीसह 13 जणांविरुद्ध विजापूर नाका पोलिस  ठाण्यात  गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.पल्लवी राजेश घोरपडे (वय 30, रा. विशालनगर, भारती विद्यापीठसमोर, जुळे सोलापूर) या विवाहितेच्या फिर्यादीवरून पती राजेश घोरपडे, सासरे एकनाथ घोरपडे, सासू सरस्वती घोरपडे, संतोष घोरपडे, विजय घोरपडे, माधुरी संतोष घोरपडे, ज्योती चंद्रकांत घोरपडे (रा.  खेसेपार्क, लोहगाव रोड, पुणे), बिपीन एकनाथ घोरपडे, शिला बिपीन घोरपडे (रा. लुंकड गार्डन, दत्त चौक, विमाननगर, पुणे), सुखदेव कापसे, नितीन थोरवे (रा. आळंदी, जि. पुणे), संजय घोरपडे, मीरा संजय घोरपडे (रा. धानोरी, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेश  घोरपडे  व त्याच्या घरातील सर्वांनी त्यांची कौटुंबिक व अनुवंशिक आजाराची माहिती, शिक्षण लपवून ठेऊन पल्लवी हिच्याशी लग्न केले. राजेश याचे ऊर्मिला या महिलेशी असलेले प्रेमसंबंध व त्यातून केलेला प्रेमविवाह हा संपुष्टात आला आहे, असे सांगून ते संबंध चालू ठेवले. ही सर्व माहिती पल्लवी पासून लपवून ठेऊन तिला मारहाण करून मणक्यास गंभीर दुखापत केली. त्यामुळे पल्लवी हिस कायमचे अधूपण आले. त्यामुळे याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक आवारे तपास  करीत आहेत.

महिला डॉक्टरची पर्स लंपास

विजापूर रोडवरील मुक्ता नर्सिंग होममधून महिला डॉक्टरची पर्स चोरून त्यातील 30 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याप्रकरणी महिलेविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डॉ. विद्या दत्तात्रय कोळी (रा. कोटणीसनगर, विजापूर रोड, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून सुप्रिया जाधव (वय 22, रा. सैफुल, सोलापूर) आणि तिच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुप्रिया जाधव व तिचा साथीदार हे दोघे मंगळवारी दुपारी डॉ. विद्या कोळी यांच्या मुक्ता नर्सिंग होममध्ये मुलाचे खोटे नाव सांगून तपासणी करण्याचा बहाणा करून आले होते. डॉ. कोळी यांची नजर चुकवून त्यांनी सोनोग्राफी मशिनला अडकाविलेली डॉ. कोळी यांची पर्स चोरून नेली. या पर्समध्ये रोख रक्कम व चावीचा जुडगा असा 30 हजारांचा ऐवज होता. याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक भोसले तपास करीत आहेत.

गळफास घेऊन आत्महत्या 

मुळेगाव रोडवरील मेघशामनगरात राहणार्‍या बाबू विश्‍वनाथ राजगुरू (वय 45) यांनी राहत्या घरात लाकडी वाशाला सुती दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.