Sat, Jul 20, 2019 23:26होमपेज › Solapur › मावस भावाबरोबर लग्न केल्याने विवाहितेला जाळले

मावस भावाबरोबर लग्न केल्याने विवाहितेला जाळले

Published On: Dec 09 2017 10:02PM | Last Updated: Dec 09 2017 10:02PM

बुकमार्क करा

मोहोळः प्रतिनिधी

प्रेमात आंधळी होऊन मावस भावाशीच लग्न करणार्‍या 19 वर्षीय विवाहितेचा सासू सासरे आणि दिराने गळफासाने खून करुन तिचे प्रेत जाळले. ही धक्कादायक घटना 09 डिसेंबर रोजी पहाटे मोहोळ तालुक्यातील येवती गावच्या शिवारात घडली. रेखा श्रीकृष्ण लेंढवे (वय 19 रा. येवती ता. मोहोळ) असे विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी मोहोळ पोलीसात सासू, सासरा आणि दिराच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे येवती व मोहोळसह संपुर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मोहोळ पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, येवती ता. मोहोळ येथील सुभाष औदुंबर लेंढवे आणि रघुनाथ रावसाहेब जमदाडे रा. येळवी ता. जत जि. सांगली हे दोघे सख्खे साडू आहेत. काही दिवसांपुर्वी रघुनाथ जमदाडे यांची मुलगी रेखा आणि सुभाष लेंढवे यांचा मुलगा श्रीकृष्ण हे दोघे नात्याने भाऊ-बहिण असताना देखील केवळ वासनेच्या प्रेमात आंधळे होऊन लग्न केले होते. त्यामुळे सुभाष लेंढवे व त्यांची पत्नी जनाबाई लेंढवे व दुसरा मुलगा प्रशांत लेंढवे हे तिघेही रेखा वर चिडून होते. 

दिनांक 06 डिसेंबर 2017 रोजी रेखा येवती येथे श्रीकृष्ण लेंढवे याच्याकडे नांदण्यास आली होती. मात्र आपल्या बहिणीच्या मुलीने व मुलाने नात्याचे भान न ठेवता लग्न केल्यामुळे जनाबाई लेंढवे यांच्यासह त्यांच्या घरातील प्रत्येक सदस्य कुटुंबाची मोठी बदनामी झाल्यामुळे निराश झाले होते. त्यामुळे त्यांनी 09 डिसेंबर रोजी पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान रेखा लेंढवे हिचा गळफास लावून खून केला. त्यानंतर पुराव नष्ट करण्याच्या उद्देशांनी त्यांनी मयत रेखाचे प्रेत घराच्या पाठीमागे असणार्‍या रानात नेऊन रात्रीतच जाळुन टाकत पुरावा नष्ट केला. हि धक्कादाखक घटना शनिवारी 09 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता मयत रेखाचे प्रेत जळून खाक झाले होते. 

याबाबत मयत रेखाचे वडील रघुनाथ जमदाडे यांनी मोहोळ पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार सुभाष औदुंबर लेंढवे, जनाबाई औदुंबर लेंढवे आणि प्रशांत औदुंबर लेंढवे (तिघेही रा. येवती ता. मोहोळ) यांच्या विरोधात खून करुन पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहोळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब जाधव हे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.