Tue, Mar 26, 2019 22:38होमपेज › Solapur › आता विवाहासाठीही ऑनलाईन अर्ज करता येणार

आता विवाहासाठीही ऑनलाईन अर्ज करता येणार

Published On: Feb 28 2018 11:20PM | Last Updated: Feb 28 2018 8:48PMसोलापूर : प्रतिनिधी

विशेष विवाह कायद्यान्वये विवाहासाठी द्यावयाची नोटीस आता विवाह नोंदणी कार्यालयात न जाताही ऑनलाईन पध्दतीने देता येणार आहे. त्यामुळे नोंदणीकृत विवाह करणार्‍या जोडप्यांना आता कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणाहून आपल्या जिल्ह्यातील विवाह नोंदणी कार्यालयात ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध  करून देण्यात आली आहे.

विशेष विवाह कायदा 1954 हा केंद्रीय विवाह नोंदणी कायदा आहे. या कायद्यामध्ये विवाह अधिकार्‍यांसमोर येऊन जोडप्यांनी विवाह करण्याची तरतूद आहे. यामध्ये नियोजित विवाहासाठी वधू आणि वराने विशिष्ट अटी आणि शर्ती पूर्ण केल्यास त्यांना कायद्यान्वये विवाह करता येतो. त्यासाठी विवाह अधिकार्‍यांकडे 30 दिवसांपूर्वी नोटीस देणे बंधनकारक आहे तसेच त्यासाठीची आवश्यक असणारी फी भरणे गरजेचे असते. यासाठी शहराच्या ठिकाणी सहाय्यक निबंधकाकडे जाऊन नोटीस देणे आवश्यक असते. मात्र या ऑनलाईन पध्दतीमुळे देशातील कोणत्याही कानाकोपर्‍यांतून विवाहासाठी आता नोंदणी कार्यालयाला नोटीस देता येणार आहे. त्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज राहिलेली नाही. आलेल्या अर्जावर काय कार्यवाही झाली याचे अपडेट मोबाईल एसएमएसव्दारे संबंधितांना कळविण्याची सोय यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नोटीस बोर्डावर लावण्यात आलेली नोटीस ही वेबपोर्टलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नवोदित जोडप्यांना या प्रणालीद्वारे विवाह करुन घेणे अधिक सोपे झाले आहे. यामध्ये नोटीस देण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही तसेच वेळेचे बंधन असणार नाही. नोटीस बोर्ड ऑनलाईन पाहता येणार आहे, तर नोटीस फी ऑनलाईन भरता येणार आहे. त्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होणार आहे.गतीमान पारदर्शी व विनामध्यस्थ सेवा घेता येणार आहे. त्यामुळे ज्या ज्या लोकांना विवाहासाठी होणार खर्च टाळून  कायदेशीर विवाह करायचा आहे त्यांनी मॅरेज रजिस्टे्रशन सर्व्हिस या ऑनलाईन प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन मुद्रांक शुल्क विभागाचे उपजिल्हाधिकारी एस.एन. दुतोंडे यांनी केले आहे.