Mon, May 20, 2019 18:10होमपेज › Solapur › बडेजाव मिरविण्यासाठी लाखों रुपयांचा चुराडा

बडेजाव मिरविण्यासाठी लाखों रुपयांचा चुराडा

Published On: Dec 10 2017 1:22AM | Last Updated: Dec 09 2017 10:27PM

बुकमार्क करा

बार्शी : गणेश गोडसे  

लग्नात हुंडा न दिल्यामुळे विवाहितेस जिवंत जाळले, हुंडा देण्यासाठी वडिलांकडे पैसे नसल्यामुळे मुलींनी आत्महत्या करणे, लग्नातील मानपान पूर्ण न केल्यामुळे सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा शारीरिक छळ आदी बातम्या वृत्तपत्रांमधून नजरेसमोर येत असतात. प्रतिवर्षी अनेक छोटे, मोठे विवाह सोहळे पार पडत असतात. मात्र बहुतांश विवाह हे समाजात बडेजाव मिरवण्यासाठीच होत असल्यामुळे अशा विवाह सोहळ्यांमधून लाखो रूपये नव्हे, तर कोट्यवधी रूपयांचा चुराडा होत असतो. सध्या विवाह सोहळ्यात करण्यात येणारा खर्च आणि आर्थिक उधळपट्टी हे सुरूच असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. खोटी प्रतिष्ठा, मान, सन्मान यासहच बडेजाव मिरवण्याच्या प्रयत्नात मोठ्या कुटुंबासह शेतकरी कुटुंबेही लग्नकार्यात करण्यात येणार्‍या अवास्तव खर्चामुळे जास्तच कर्जाच्या बोझ्याखाली ढकलली जात आहेत. 

मानपानामुळे कटुतेत वाढ

लग्नात मानपान करण्यात कुचराई केली, आम्हाला जाणिवपूर्वक डावलण्यात आले, अन्याय करण्यात आला, दागदागिने कमी केले, ठरल्याप्रमाणे हुंडा दिला गेला नाही आदी कारणे पुढे करून भांडणे काढण्याचा प्रघात सुरू होत असल्याचे दिसून येत आहे. 

मंगलकार्यालयांना पसंती

आज समाजात घरासमोर जेमतेम पद्धतीने लग्नसमारंभ पार न पाडता आपापल्या स्टेट्सला सूट होण्याच्या दृष्टीने लाखो रूपयांची धूळधाण विवाह सोहळ्यांमधून होताना नियमित दिसते.घरासमोर लग्न लावून देण्यापेक्षा शाही थाटात महागड्या मंगलकार्यालयात बुकींग करून विवाह समारंभ उरकण्याकडे कल वाढताना दिसून येत आहे.

सामूहिक विवाह सोहळ्यास गती हवी

सामूहिक विवाह सोहळे ही सध्या काळाची गरज ठरू पाहत आहे. गावातील ईर्षा, मान, सन्मान, कोण मोठा, व्यक्तिदोष आदी अनेक कारणांसाठी मानव ईर्षा निर्माण करतात व त्या अहंमपणामुळे कोट्यवधी रूपयांचा चुराडा करण्यासाठी ते मागे पुढे बघत नाहीत. काहीही झाले तरी चालेल पण माझे लग्न झक्कासच झाले पाहिजे, असा  हेकेखोरपणा धरला जातो. त्यामुळे अशा प्रकारांना प्रतिबंध घालून सामुदायिक विवाह सोहळ्यास गती देणे गरजेचे आहे. सामूहिकरित्या लग्न झाले तसेच लग्न कार्य पार पडल्यास खर्चात मोठी बचत होऊन शेतकरी बांधव कर्जबाजारी होण्यापासून वाचण्यास मदत होणार आहे. लग्नकार्य म्हटले की शेतकरीराजा आपली जमीन विक्रीस काढतो. लग्न धुमधडाक्याने लावून देतो. मात्र त्यामधून सावरताना त्याच्या नाकीनऊ येते. 

अनियमित पाऊस, उत्पादनास नसलेला हमीभाव, उदासीन शासन या कार्यपद्धती बरोबरच घरगुती जंगी विवाह सोहळे हेही कर्जबाजारीपणाचे मुख्य कारण म्हणून पुढे येत आहे.