Wed, Sep 18, 2019 21:29होमपेज › Solapur › बाजार समिती मतदार याद्यांसाठी हरकतींचा पाऊस

बाजार समिती मतदार याद्यांसाठी हरकतींचा पाऊस

Published On: Feb 27 2018 8:20AM | Last Updated: Feb 26 2018 10:13PMसोलापूर : प्रतिनिधी 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती नोंदविण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी जवळपास दीड हजार हरकती दाखल झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक हरकती उत्तर सोलापूर तालुक्यातील असून वडाळा गावच्या जवळपास दोनशे हरकती दाखल झाल्या आहेत.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पहिल्यांदाच थेट शेतकर्‍यांमधून होणार आहे. यासाठी गणनिहाय स्वतंत्र निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या शेतकर्‍यांच्या नावे किमान 10 गुंठे जमीन आहे, अशा शेतकर्‍यांना यामध्ये मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे निवडणुकीचा खर्चही वाढला असला, तरी या निर्णयामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधान आहे. मात्र, ज्या शेतकर्‍यांची नावे या मतदार यादीत समाविष्ट झालेली नाहीत असे शेतकरी आता जागे झाले आहेत. हरकत घेण्याच्या शेवटच्या दिवशी हरकतींचा पाऊस पडला आहे. त्यामुळे निवडणूक शाखेचे कर्मचारीही वैतागले असून रात्री उशिरापर्यंत या हरकतींची माहिती जुळविण्याचे काम सुरू होते. आलेल्या हरकतींमध्ये नावात बदल आणि मतदार याद्यांमध्ये नाव समाविष्ट करण्याच्या सर्वाधिक हरकती आल्या आहेत. आलेल्या हरकतींवर येत्या पाच दिवसांत सुनावणी घेऊन निकाली काढण्यात येणार आहेत. त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक शाखेच्यावतीने सांगण्यात आली आहे.