Fri, Mar 22, 2019 05:32
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › उडीद खरेदी केंद्रास उत्स्फूर्त प्रतिसाद

उडीद खरेदी केंद्रास उत्स्फूर्त प्रतिसाद

Published On: Dec 08 2017 1:43AM | Last Updated: Dec 07 2017 8:11PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीत पाच तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी सुरु करण्यात आलेल्या उडीद, मूग हमीभाव खरेदी केंद्रास शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. 22 नोव्हेंबरपासून सुरु करण्यात आलेल्या या केंद्रात आतापर्यंत सुमारे 19 लाखांची उडीद खरेदी करण्यात आली आहे. खरेदी झाल्यानंतर मात्र शेतकर्‍यांना 15 दिवसांपर्यंतही पट्टी मिळत नसल्याने शेतकर्‍यांची नाराजी दिसून येत आहे. 

सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या पुढाकारामुळे बाजार समितीत खरेदी केंद्र सुुरू झाले आहे. या योजनेसाठी शेतकर्‍यांनी ऑनलाईन प्रणालीने उडीद व मूग विक्रीची नोंद करीत आहेत. शेतकर्‍यांच्या बँक खात्यात शासनाकडून रक्‍कम जमा करण्यात येत आहे. 

बाजार समितीच्या गूळ गोदामात सुरु करण्यात आलेल्या या केंद्रात आतापर्यंत 68 शेतकर्‍यांकडून 348 क्‍विंटल उडीद खरेदी करण्यात आली आहे. तर दोन शेतकर्‍यांकडून दीड क्‍विंटल मुगाची खरेदी करण्यात आली आहे. उडीदासाठी 5 हजार 400, तर मूगासाठी 5 हजार 475 रुपयांचा दर प्रतिक्‍विंटलमागे देण्यात येत आहे. द. सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, सांगोला, मंगळवेढा व सांगोला या तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी हे खरेदी केंद्र सुुरु करण्यात आले आहे. 

बाजार समितीत काही शेतकरी आडतदारांकडे मूग व उडीद विक्रीसाठी आणत आहेत. त्यांना येथे आल्यानंतर खरेदी केंद्र सुरू झाल्याची माहिती मिळत असल्याने काही शेतकरी थेट खरेदी केंद्रात आपला माल उतरवत आहेत. ऑनलाईन प्रणालीने नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांकडून व माल आणण्यात यावा, असा संदेश देण्यात आलेल्या शेतकर्‍यांकडूनच खरेदी केंद्रात माल खरेदी करता येतो. तरीही ऐनवेळी आलेल्या शेतकर्‍यांनी नुकसान होऊ नये म्हणून अशा शेतकर्‍यांनी लगेच ऑनलाईनला नोंदणी करून या शेतकर्‍यांनाही न्याय देण्याचा प्रयत्न बाजार समिती यंत्रणेकडून नियमात करण्यात येत आहे. त्यामुळे या उपक्रमाचे कौतुक होत आहे. 

बाजार समितीचे प्रशासक कुंदन भोळे, प्रभारी सचिव विनोद पाटील, योजना समन्वय अधिकारी महेश बोराळकर आदींकडून खरेदी केंद्रात अधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शेतकर्‍यांसाठी खरेदी केंद्रातच चाळण करण्याची सोय उभारण्यात आली आहे.  धान्याची आवक वाढल्याने व गोदाम हाऊसफुल्‍ल झाल्याने बाजार समितीच्या अधिकार्‍यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याशी संपर्क साधून खरेदी झालेला माल वेअर हाऊसमध्ये पाठविण्याचे काम दोन दिवसांपासून सुरु केले आहे.