सोलापूर : प्रतिनिधी
पंढरपूर येथील सहायक पोलिस अधीक्षकांच्या पथकाने उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील जुगार अड्ड्यावर बुधवारी रात्री छापा टाकून 10 जुगारींना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, अनेक दुचाकी आणि मोबाईल हँडसेट असा 1 लाख 81 हजार 750 रुपयांचा ऐवज जप्त केला.
विजय भगवान कदम, नारायण आप्पा मते, भीमाशंकर अर्जुन नारायणकर, देविदास सुखदेव महापुरे, कमलाकर दगडू इंगळे (रा. मार्डी), रहिम महंमद शेख (रा. बाळे), रामेश्वर औदुंबर कोळी (रा. बाणेगाव), किसन मुगा साबळे (रा. वडाळा), महावीर सिद्राम कांबळे, श्रीकृष्ण कडाप्पा जाधव (रा. राळेरास) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांना मार्डी येथील यमाईदेवी मंदिराकडे जाणार्या रस्त्यावरील पर्णकुटीजवळ पत्राशेडमध्ये जुगार अड्डा चालत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून अधीक्षक प्रभू यांनी पंढरपूरचे सहायक पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावरून सहायक पोलिस अधीक्षक पिंगळे यांनी त्यांच्या पथकासह मार्डी येथील जुगार अड्ड्यावर छापा मारला असता वरील सर्वजण हे जुगार खेळताना मिळून आले.