Sun, Apr 21, 2019 05:46होमपेज › Solapur › पंढरीत मराठा युवकाची आत्महत्या, जेल भरो आंदोलनही चिघळले 

पंढरीत मराठा युवकाची आत्महत्या, जेल भरो आंदोलनही चिघळले 

Published On: Sep 10 2018 8:12PM | Last Updated: Sep 10 2018 8:12PMपंढरपूर : प्रतिनिधी 

आरक्षण मिळत नाही, नोकरी नाही, लग्न जमत नाही यामुळे नैराश्य आलेल्या येथील युवकाने आत्महत्या केल्याने पंढरपूर शहर आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे. अमोल विष्णू कदम ( वय 30, रा. प्रतापनगर, ल.टाकळी, ता. पंढरपूर ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. आंदोलनाच्या दरम्यान झालेल्या तोडफोडीचे कारण पुढे करून पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाने आज ( सोमवारी ) जेलभरो आंदोलन केले.

लक्ष्मी टाकळी येथे राहत असलेल्या अमोल विष्णू कदम या या युवकाने सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी स्वयंपाकाच्या खोलीत पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी पोलीसांना त्याच्या खिशामध्ये चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये मी अमोल स्वत:, मला नोकरी नसल्यामुळे, माझे लग्न जमत नसल्यामुळे, समाजाला आरक्षण नसल्यामुळे आत्महत्या करीत आहे. त्यास कोण जबाबदार नाही, अशा मजकुराची चिठ्ठी सापडली आहे. या घटनेचे वृत्त समजताच संपूर्ण पंढरपूर शहर आणि तालुक्यात खळबळ उडाली असून मराठा आरक्षणामुळे तालुक्यात ही पहिलीच आत्महत्या झाली आहे. गेल्या दिड महिन्यांपासून पंढरपूर शहर, तालुक्यात मराठा क्रांती  मोर्चाच्या आंदोलनाची चर्चा असून ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनही झाले. या आंदोलनात त्याचबरोबर सोमवारी झालेल्या जेलभरो आंदोलनाच्या मिटींगमध्येही अमोल कदम सहभागी होता.अशा प्रकारे त्याने आत्महत्या केल्याचे समजताच. जेल भरोसाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी त्याच्या घराकडे धाव घेतली. अमोल कदम चे वडील ट्रक चालक आहेत. त्याला आणखी एक भाऊ आणि बहीण असून स्वत: अमोल भाड्याने रिक्षा घेऊन चालवत होता.त्याचे शिक्षण 12 वीपर्यंत झाले होते असे सांगीतले जात असून घरची  अर्थिक परिस्थीती  हलाखीची असल्यामुळे, तसेच वय सरत असतानाही लग्न जमत नसल्यामुळे तो निराश होता असे त्याच्या मित्रांकडून सांगीतले जाते. समाजाला आरक्षण मिळाले तर पुढच्या पिढीचे तरी भले होईल होईल म्हणून अमोल मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी होत होता असे त्याचा चुलतभाऊ संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते स्वागत कदम यांनी सांगीतले. पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा तसेच शवविच्छेदन केले असून सायंकाळी शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचे वृत्त समजताच पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातही हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

जेल भरो आंदोलन चिघळले

दरम्यान मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी पुकारलेले जेल भरो आंदोलन चिघळले असून सायंकाळी उशिरापर्यंत कार्यकर्ते रखूमाई सभागृहात ठिय्या मारून बसलेले आहेत. सोमवारी सकाळी शेकडो कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर जेलभरोसाठी ठिय्या मारून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सकाळी 11 वाजता सुरू झालेले ठिय्या आंदोलन दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू होते. त्यानंतर पोलीसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन रखूमाई सभागृहात आणून प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले. 

मात्र पोलीसांनी कोणत्याही प्रकारचे ठोस आश्‍वासन दिले. 30 ते 40 कार्यकर्ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत रखूमाई सभागृहातच ठिय्या मारून बसलेले होते. पोलीसांनी सुरू केलेली कारवाई स्थगित करण्यात यावी. अज्ञात व्यक्तीं म्हणून नोंद असलेल्या गुन्ह्यात मराठा समाजातील कार्यकर्त्यांना अटक करू नये. दाखल झालेले गुन्हे मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार मागे घेण्यात यावेत अशी मागणी घेऊन सायंकाळी उशिरापर्यंत हे कार्यकर्ते ठिय्या मारून बसलेले होते. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तहसीलदार मधूसूदन बर्गे यांनी आंदोलकांशी चर्चा केली मात्र आंदोलक ठोस आश्‍वासनाच्या मागणीवर ठाम होते. त्यामुळे सायंकाळी 7 वाजल्या तरीही रखूमाई सभागृहात आंदोलकांचा ठिय्या सुरूच होता.