Thu, May 23, 2019 20:43
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › मराठा आरक्षण : माढ्यात आत्मदहनाचा, तर पंढरपुरात जलसमाधीचा प्रयत्न (Video)

मराठा आरक्षण : माढ्यात आत्मदहनाचा, तर पंढरपुरात जलसमाधीचा प्रयत्न (Video)

Published On: Jul 28 2018 11:27AM | Last Updated: Jul 28 2018 12:11PMसोलापूर : प्रतिनिधी 

महाराष्ट्रभर मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलने सुरु आहेत. याच दरम्यान काही आंदोलकांनी आपले जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. आतापर्यंत तीन आंदोलकांनी आपला जीव गमावला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपले जीवन समाप्त करण्याचा प्रयत्न आज सोलापुरातही झाला. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात बंद आणि चक्का जाम आंदोलने होत आहेत.  आज सोलापुरात चक्का जाम आंदोलन होत आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून माढा तालुक्यात टेंभूर्णे - पुणे महामार्गावर ठिया आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान तानाजी पाटील यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी लगेचच त्यांना रोखले त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. 

सुस्ते ता. पंढरपूर येथे भीमा नदीत युवकाचा जलसमाधी घेण्याचा प्रयत्न

मराठा आरक्षण मागणी साठी सुस्ते ( ता. पंढरपूर ) येथे सचिन शिनगारे ( वय २६) या युवकाने भीमा नदीच्या पाण्यात उडी मारून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवण्यात यश आले असून उपजिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

सुस्ते येथे दोन दिवसांपासून मराठा आरक्षण मागणीसाठी उपोषण आंदोलन सुरू आहे. शनिवारी जलसमाधी घेण्याचा ईशारा आंदोलकांनी दिला होता. त्यानुसार सचिन शिनगारे या युवकाने सकाळी १० वाजण्याच्या सुमारास भीमा नदीच्या पाण्यात उडी मारली. पुळूज बंधाऱ्यात खोल पाणी असल्यामुळे सचिन बुडू लागला. यावेळी इतर लोकांनी त्यास बाहेर काढून गंभीर अवस्थेत खाजगी वाहनातून उपचारासाठी पंढरपूर येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेचे वृत्त समजताच शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती.