Thu, Jul 18, 2019 02:26होमपेज › Solapur › आरक्षण आंदोलनामुळे पंढरीत प्रशासन पेचात

आरक्षण आंदोलनामुळे पंढरीत प्रशासन पेचात

Published On: Jul 21 2018 10:35PM | Last Updated: Jul 21 2018 9:38PMपंढरपूर : तालुका प्रतिनिधी

 मराठा आणि धनगर, महादेव कोळी आरक्षणाच्या आंदोलनावरून पोलिस प्रशासन पेचात सापडले आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा निर्विघ्न पार पाडण्यासाठी जादा पोलिस कूमक मागवण्यात आली असली तरी सायंकाळी उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांचा अधिकृत पंढरपूर दौरा आला नव्हता. त्यामुळे अखेरच्या क्षणी मुख्यमंत्री येतील किंवा दौरा रद्द करतील, अशी शक्यता व्यक्‍त होत आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी मराठा, धनगर, महादेव कोळी आणि मुस्लिम समाजाच्या भावनांचा विचार करून यात्रा शांततेत पार पडावी, वारकर्‍यांना कसलाही त्रास होऊ नये, म्हणून महापुजेला येऊ नये असे आवाहन आ. भारत भालके यांनी पत्रकार परिषदेत केले. 

आषाढी यात्रेची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करू देणार नाही असा पवित्रा मराठा, धनगर, महादेव कोळी समाजाने घेतला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून पंढरपूरचे प्रशासन आणि राजकीय वातावरण यात्रा काळातही तणावपूर्ण आहे. सुमारे 12 ते 15 लाख भाविकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या महापुजेला काही विघ्न आले तर मोठा गदारोळ होऊ शकतो, हे लक्षात घेऊन पोलिस प्रशासन सर्व बाजुंनी प्रयत्न करीत यात्रेच्या नियोजनात लागले आहे. मुख्यमंत्र्यांचा अधिकृत दौरा शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत आलेला नाही. मात्र मुख्यमंत्री येणार असल्याचे गृहित धरून प्रशासकीय पातळीवर सर्व तयारी सुरू झालेली आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात आणि पंढरपूर शहर व तालुक्यातही गेल्या दोन दिवसांत 5 ते 6 एस.टी. बसेसची तोडफोड करण्यात आलेली आहे. गनिमी काव्याने आंदोलन केले जात असल्याने पोलिस प्रचंड तणावात असल्याचे दिसत आहेत. 

शनिवारी दुपारी शहर पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडोळे यांच्यासह 12 ते 15 पोलिसांच्या पथकाने मराठा क्रांती मोर्चाच्या दोन कार्यकर्त्यांना इंदिरा गांधी व्यापारी संकुल येथे ताब्यात घेतले होते. त्यांच्या अटकेची अफवा पसरताच मोठ्या संख्येने इंदिरा गांधी व्यापारी संकुलात कार्यकर्ते जमा झाले होते. आ. भारत भालके यांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन दोन्ही कार्यकर्त्यांना पोलिसांच्या ताब्यातून बाजुला काढले. अशा प्रकारे कार्यकर्त्यांवर कारवाई कराल तर तालुक्यात तणाव वाढेल, तुम्ही कार्यकर्त्यांना अटक करू शकत नाही, असे बजावत दोन्ही कार्यकर्त्यांना आपल्या स्वत:च्या कारमध्ये बसवून नेले. यावेळी पोलिस निरीक्षक पाडोळे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आ. भालके यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पाडोळे यांनी आ. भालके यांच्या कारचा सांगोला मार्गे जुन्या न्यायालयापर्यंत मोटारसायकलवरून पाठलागही केला मात्र आ. भालके यांनी कार्यकर्त्यांना गाडीत घेऊन मंगळवेढा गाठले आणि तिथून अज्ञातस्थळी रवाना केले. या घटनेचे पडसाद ग्रामीण भागातही उमटले असून प्रशासनाचा निषेध केला जाऊ लागला आहे. सायंकाळी 6 च्या सुमारास सांगोला रोडवर एका एस.टी. बसची तोडफोडही केली.